त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील गावजेवणात एक पंगत विशिष्ट जातीचे लोक व त्यांच्या कुटुंबियांची होते. तर इतर बहुजनांसाठी वेगळी पंगत होते. ही पद्धत माणसामाणसात भेदभाव करणारी असून,सामाजिक विषमतेला खतपाणी घालणारी आहे. ही पद्धत बंद व्हावी,अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. अशा आशयाचे निवेदन त्यांनी त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना दिले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, अनेक वर्षांच्या परंपरेनुसार त्र्यंबकेश्वर येथील महादेवी ट्रस्टतर्फे दरवर्षी प्रयोजन म्हणजे गाव जेवण आयोजित केले जाते. दरवर्षी चैत्र किंवा वैशाख महिन्यात ग्रामदेवतांची काही धार्मिक कर्मकांडे केल्यावर ही जेवणावळ आयोजित केली जाते.त्यासाठी संपूर्ण गावातून लोक वर्गणी तसेच वस्तू रुपात खाद्यसामग्री गोळा केली जाते. गावजेवण असल्याने त्र्यंबकेश्वर गावातील सर्वच सामाजिक स्तरातील जवळपास सर्वच लोक इथे जेवणासाठी येतात.
मात्र ह्या गावोत्सवात एका विशिष्ट जातीचे लोक व त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी स्वतंत्रपणे अन्न शिजवले जाते व त्यांची जेवणाची पंगत सुद्धा इतर बहुजन समाज घटकांपासून वेगळी बसते. महादेवी ट्रस्ट कडून सार्वजनिक भोजनाच्या ठिकाणी असा संतापजनक व मानवतेला कलंक असणारा जातीभेदाचा प्रकार राजरोसपणे येथे वर्षांनुवर्षे घडतो , असे तेथील काही स्थानिक लोकांनी महाराष्ट्र अंनिसच्या लक्षात आणून दिले.
जर संबंधित महादेवी ट्रस्ट कडून असा जातीभेद व पंगतीभेद होत असेल तर ही घटना या देशाच्या राज्यघटनेचे उल्लंघन करणारी तर आहेच, शिवाय बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणून मानले गेलेल्या त्र्यंबकेश्वर गावाला श्रद्धेपोटी येणाऱ्या भाविकांच्या श्रद्धेशी केलेली ती गंभीर प्रतारणा आहे, असे महाराष्ट्र अंनिसचे मत आहे. उद्या रविवार दिनांक २३ एप्रिल, २०२३ रोजी या महादेवी ट्रस्ट कडून गावजेवणाचा कार्यक्रम होणार असल्याचे समजते आहे.
जर सर्व गावाकडून लोक वर्गणी जमा करून गावजेवण दिले जात असेल तर,तेथे कोणत्याही प्रकारचा भेदाभेद न करता सर्वांसाठी एकाच वेळी अन्न शिजवले जाईल व सर्व गावकरी एकाच पंक्तीत बसून जेवण करतील, असे आपण आजच संबंधितांना बोलावून घेऊन, लेखी पत्राद्वारे समज देण्याची मागणी अंनिसने तहसिलदार त्र्यंबकेश्वर यांचेकडे केली आहे. जर त्र्यंबकेश्वर येथील महादेवी ट्रस्टने धार्मिक प्रथा-परंपरेच्या नावाने हा सामाजिक विषमतेचा व जातीभेदाला खतपाणी घालणारा अनिष्ट,अमानवीय आणि राज्यघटनेचे उल्लंघन करणारा प्रकार चालूच ठेवण्याचा अट्टाहास केला,आग्रह धरला तर संबंधितांवर आपण कायदेशीर कारवाई करावी,अशी विनंती अंनिसच्या वतीने करण्यात आली आहे.
शिवाय धार्मिक विधी, कर्मकांडाच्या नावाने आपल्या त्र्यंबकेश्वर तालुका कार्यक्षेत्रात अन्य ठिकाणीही जर असे माणसामाणसात भेद करणारे आणि घटनाबाह्य प्रकार चालू असतील तर ते कायमस्वरूपी बंद करावेत, अशी विनंतीही निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर राज्य प्रधान सचिव, डॉ. ठकसेन गोराणे, राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे,प्रा डाॅ सुदेश घोडेराव,ॲड समीर शिंदे, कार्याध्यक्ष त्र्यंबकेश्वर संजय हराळे, प्रधान सचिव, त्र्यंबकेश्वर दिलीप काळे यांच्या सह्या आहेत.
Nashik Trimbakeshwar Village Caste Food Superstition