त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील देवगाव शासकीय कन्या आश्रमशाळेतील इयत्ता नववीच्या विद्यार्थिनीचा अचानक मृत्यू झाला आहे. कु. सुगंधा काशीराम वारे, वय १५, रा. निमनवाडी (देवगाव) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. दरम्यान, आश्रमशाळेचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. मृतदेहाची हेळसांड होण्यासह अनेक बाबी आता ऐरणीवर आल्या आहेत.
सुगंधा ही काल रात्री जेवण करुन झोपली. पहाटे तीन वाजता तिला अस्वस्थ वाटू लागले. तिला उलटी झाली आणि ती बेशुद्ध पडली. आश्रमशाळेतील शिक्षक किंवा जे कोणी हजर होते त्यांनी तिला देवगावहून थेट खोडाळा (जि. पालघर) येथे उपचारासाठी नेले. मात्र, रस्त्यातच तिची प्राणज्योत मालवली. मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्याचे खोडाळा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. तथापि नाशिक येथे मृतदेह नेण्याऐवजी तो मोखाडा येथे नेण्यात आला. आश्रमशाळा नाशिक जिल्ह्यात असल्याने अखेर शेवटी मृतदेह नाशिकला आणण्यात आला. त्यामुळे विद्यार्थिनीच्या मृतदेहाची हेळसांड केल्याचा आरोप केला जात आहे.
आश्रमशाळेजवळ वैतरणा, त्र्यंबकेश्वर, घोटी हे जवळचे रुग्णालय आहेत. असे असताना शेजारच्या जिल्ह्यातील रुग्णालयात उपचारासाठी का नेण्यात आले, असा प्रश्न मुलीचे वडील काशीराम वारे आणि एल्गार संघटनेचे भगवान मधे यांनी केला आहे. आश्रमशाळेत शिक्षक राहत नाहीत. शाळेचे मुख्याध्यापक नाशिक येथे राहतात. देवगाव या ठिकाणी शासकीय आश्रमशाळा असून या ठिकाणी इ.१ ली ते १२ वी पर्यंत वर्ग आहे. या ठिकाणी ४०० पेक्षा जास्त मुली शिक्षण घेत आहेत. या मुलींची कोणत्याही प्रकारची आरोग्याची काळजी घेतली जात नाही. वेळोवेळी आरोग्य तपासणी झाली असती तर आज या मुलीचा जीव वाचला असता. या मुलीच्या मृत्यूला जबाबदार हे शाळा प्रशासन असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भगवान मधे यांनी केली आहे.
शाळेतील विद्यार्थीनींची आरोग्य तपासणी शाळा सुरू झाल्या पासून एकदाही झाली नाही. स्वतंत्र आरोग्य पथक असताना अजून ते शाळेवर आले नाहीत. या शाळेचे मुख्याध्यापक व अधिक्षिका यांना तात्काळ निलंबित करा.
अशीही मागणी करण्यात येत आहे. हीच शाळा पिण्याच्या पाण्याचे कारण देत बंद ठेवण्यात आली होती. याच आश्रमशाळेत मागील वेळी आठ मुलींना विषबाधा झाली होती. त्यावेळी देखील आदिवासी विभागाने काहीच कारवाई केली नाही. त्यावेळी मी स्वतः त्या मुलींना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो. माझ्या पत्नीने आमच्या लहान बाळाला घेऊन स्वतः मुलींना मदत केली होती. आणि त्या मुलीचे जीव वाचवले होते. कारण त्यावेळी देखील धारगाव प्रा.आ. केंद्रात डॉक्टर उपस्थित नव्हते, असे मधे यांनी सांगितले आहे.
दरम्यान, मुलीचे वडील काशिराम वारे म्हणाले की, शाळा सुरु झाल्यावर आम्ही सुगंधास आश्रमशाळेत आणून सोडले. तेव्हा तिची तब्ब्येत ठणठणीत होती. तिने तब्येतीविषयी काहीच तक्रार केली नव्हती.