नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या आणि तीर्थाटनासाठी ख्यात असलेल्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या ऐतिहासिक मंदिरात काही व्यक्तींनी बळजबरी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मंदिराच्या सुरक्षारक्षकांनी वेळीच या व्यक्तींना अडविण्यात आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. मात्र, या घटनेमुळे मंदिर परिसरासह त्र्यंबक शहरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. पोलीस आणि मंदिर प्रशासनाचा हस्तक्षेपानंतर येथील तणाव निवळला असला तरी ब्राह्मण महासंघाने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
राज्यात अकोला आणि नगर जिल्ह्यातील शेवगाव येथे दंगल उसळली. त्याचेच पडसाद स्वरुप त्र्यंबकेश्वरमध्ये चिंताजनक प्रकार घडला आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात बळजबरी घुसण्याचा प्रयत्न काही व्यक्तींनी शनिवारी (१३ मे) सायंकाळच्या सुमारास घडला. मात्र मंदिराच्या सुरक्षा रक्षकांनी या व्यक्तींना मंदिरात जाण्यास मज्जाव घातला. तरीही या व्यक्तींनी मंदिरात जाण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यामुळे मंदिराच्या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले.
परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेत तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा मंदिराच्या ठिकाणी हजर झाला. पोलिस आणि मंदिर प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर हा तणाव निवळला. मात्र, त्र्यंबक देवस्थान आणि ब्राम्हण महासंघाबरोबरच इतर संघटनांनी या प्रकाराबाबत पोलिसांशी पत्र व्यवहार केला आहे. घडलेली घटना गंभीर असून संबंधित व्यक्तींना मंदिरात प्रवेश का करायचा होता? असा प्रश्नही त्यात विचारण्यात आला आहे. त्याचबरोबर संबंधितांवर कायदेशीर कारवाईची मागणीही करण्यात आली आहे. जर पोलिसांनी कारवाई केली नाही तर आम्ही आंदोलन करु, असा इशारा ब्राम्हण महासंघाने दिला आहे.
Nashik Trimbakeshwar Temple Tense Situation Police