त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील पहिणे बारी जवळील चिखलवाडी येथे स्कूल व्हॅन आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला आहे. भरधाव वेगातील दुचाकी स्कूल व्हॅनवर आदळली. या अपघातात दुचाकीवरील दोघे आणि व्हॅन चालक गंभीर जखमी झाले आहेत. तर, विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. पेगलवाडी शिवारातील रुपेश्वर महादेव मंदिराजवळ हा अपघात घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वहरा इंग्लिश मिडीयम स्कूलची व्हॅन टाटा मॅजिक (MH.15.DS.6737) ही आज दुपारी तीन वाजेच्या दरम्यान पहिणे बाजूकडून त्र्यंबकेश्वरकडे जात होती. त्याचवेळी पेगलवाडीकडून पहिनेकडे दुचाकी (MH.15.JF.2660) येत होती. भरधाव दुचाकी थेट स्कूल व्हॅनवर धडकली. या अपघातात दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. तर, दुचाकीवरील दोघांसह व्हॅन चालक हे गंभीर जखमी झाले आहेत.
दुचाकीवरील संदीप मेरांदे (वय 25), रमेश आचारी (वय 25), व्हॅन चालक दिलीप वारघडे (वय 46) अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. तर काही विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक प्रदीप भाबड, रुपेशकुमार मुळाने यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात १०८ अॅब्युलन्सने दाखल करण्यात आले. जखमी विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले. तर, दुचाकीवरील दोघांना अधिक उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.