नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवर सोमवारी रात्री भीषण अपघात झाला आहे. कार आणि दुचाकीच्या या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. मृत झालेले दोघे दुचाकीवरील प्रवासी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार (१९ जून) रोजी रात्री ९वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. त्र्यंबक रोडवरील हॉटेल संस्कृती जवळ हा अपघात घडला. होंडा सिटी कार (MH26Ak3061) ही त्र्यंबकेश्वरहून नाशिकच्या दिशेने येत होती. त्याचवेळी कारचा टायर अचानक फुटला. त्यामुळे ही कार डिव्हायडरला आदळून पलट्या खात दुसऱ्या लेनमध्ये आली. मात्र, त्याचवेळी या लेनवरुन दोन दुचाकीस्वार त्र्यंबककडे जात होते. आणि याच दुचाकीला कारने जोरदार धडक दिली.
हा अपघात एवढा भीषण होता की कारने दोन्ही दुचाकीस्वारांना अनेक मीटरवर फरफटत नेले. दुचाकी MH15FJ7467 आणि MH15DN8201 या दुचाकीला ही धडक बसली. या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच सातपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी घटनास्थळी धाव घेतली. नामदेव विठ्ठल शिद आणि सुनील मनोहर महाले अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत.
शिद हे नाशिक तालुक्यातील राजेवाडी तर महाले हे वाढोली येथील रहिवासी आहेत. या अपघात प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातग्रस्त होंडा सिटी कार मधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. मृत सुनील महाले हे स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. तर, नामदेव शीद यांच्या पश्चात पत्नी व पाच अपत्ये असा परिवार आहे.