त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – त्र्यंबक – घोटी रोडवर पहिणे घाट निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिध्द आहे. पावसाला सुरुवात झाली की, अंजंनेरी, ब्रह्मगिरी पर्वत शिखरां वरुन असंख्य धबधबे कोसळतात. त्यामुळे हे धबधबे सुरु झाले की असंख्य पर्यटकांची पावले आपोआप इकडे वळतात. शनिवार आणि रविवार पर्यटकांच्या गर्दीचा उच्चांक होता. नेकलेस धबधब्याजवळ पर्यटकांमध्ये हाणामारीचीही घटना घडली. तर पोलिसांचा तोकडा बंदोबस्त असल्याने पर्यटकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
डोंगरमाथ्यावरुन कोसळणारे शुभ्रधवल धबधबे, खळखळ वाहणार्या नद्या नाले, धरणीमातेने पांघरलेला हिरवा शालु, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे, अशी अधुनमधुन ढगांच्या खिडकीतुन डोकावणारी सुर्यकिरणे, जणु काही स्वर्गभुमीची अनुभुती देणार्या देवभुमी त्र्यंबकेश्वर परिसरात विविध निसर्गरम्य ठिकाणी भाविकांसह पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती.
आज सकाळपासुनच पर्यटकांची गर्दि वाढु लागली. पहिणे परिसरात शेकडो चारचाकी, दुचाकींची गर्दी झाली होती. पेगलवाडी फाट्यावर त्र्यंबक पोलीसांनी तर पहिणे बारीत वाडीवर्हे पोलीसांनी बंदोबस्त लावल्यामुळे ट्रॅफीक जॅम झाली नाही. वाडीवर्हे पोलीसांनी वाहनांची तपासणी करीत दारुच्या बाटल्या पकडल्या व पर्यटकांनाच दारु ओतुन देण्यास भाग पाडले. नेकलेस धबधब्याजवळ पर्यटकांमध्ये हाणामारीचीही घटना घडली. काही टवाळखोरांकडे लोखंडी राॅड, गुप्ती सारखे हत्यारंही असल्याचे समजले.
नेक पर्यटकांनी ठिकठिकाणी धबधब्याखाली भिजण्याचा तसेच नदीच्या पाण्यात बसण्याचा आनंद घेतला. तसेच भाजलेले मक्याचे कणसं आणी वाफाळत्या चहाची तडाखेबंद विक्री झाली. नेकलेस धबधब्या परिसरात जाण्यासाठी वनविभागातर्फे प्रवेश शुल्क घेण्यात आले. गर्दीच्या मानाने पोलीसांचा बंदोबस्त तोकडा होता. काही तरुणाईने नशापाणी करुन धुडगुस घातल्याने परिवारा सोबत निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या महिलांनी नाराजी व्यक्त केली.
त्र्यंबकेश्वर पो. स्टे. चे पो.नि. बिपीन शेवाळे यांचे मार्गदर्शनाखाली पो.ऊ.नि. जगताप, पो.ह. रुपेशकुमार मुळाणे व सहकार्यांनी तर वाडीवर्हे पो.स्टे. चे पो. नि. समीर बारवकर यांचे मार्गदर्शनाखाली पो.ह. मांडवदे, निलेश मराठे, बोराडे, विक्रम काकड, निंबेकर, होमगार्ड शहाणे, जिल्हा वाहतुक शाखेचे खैरे आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता.