त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पांडूरंगाच्या भेटीने कृतार्थ होऊन श्रीसंत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे आज त्र्यंबकेश्वर मध्ये आगमन झाले. हरिनामाचा जयघोष आणि टाळ मृदुंगाच्या गजराने परिसर दणाणुन गेला होता.
आषाढी एकादशीच्या पंढरपुर वारीसाठी जेष्ठ पौर्णिमेच्या एक दिवस आधी श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे प्रस्थान झाले होते. आषाढी एकादशीला पांडूरंगाचे दर्शन व द्वादशीला उपवास सोडून गुरुपौर्णिमेच्या दुसर्या दिवशी पालखी पुन्हा परतीच्या मार्गाला निघाली. एकंदरीत ४६ दिवसांचा पायी प्रवास करून आज दुपारी १२ वाजता पालखी त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल झाली.
त्र्यंबकेश्वरी ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी येतांना निवृत्तीनाथांसह भावंडांनी तुपादेवी फाट्याजवळ विसावा घेतला, त्यामुळे येथील स्मृती मंदीरातील समाधीवर नाथांची प्रतिमा ठेऊन अभंग गायन व आरती करण्यात आली. निवृत्तीनाथांचे गुरु गहिनीनाथ यांच्या समाधीस्थानाजवळ महानिर्वाणी आखाड्यात नाथांच्या पालखीचे साधू महंतांच्या उपस्थितीत पूजन झाले. त्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ होऊन त्रंबकेश्वर नगराच्या प्रवेशद्वारा जवळ औपचारिक स्वागतासाठी थांबली. यावेळी त्र्यंबकेश्वरच्या माजी उपनगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार यांनी पालखीचे यथोचित स्वागत केले.
यावेळी स्थानिक नागरिकांसह उपसमिती सदस्य बाळासाहेब पाचोरकर आदी उपस्थित होते. संस्थानचे अध्यक्ष निलेश गाढवे पाटील, पालखी प्रमुख नारायण मुठाळ, जयंत महाराज गोसावी, सचिव सोमनाथ घोटेकर, विश्वस्त तथा प्रसिद्धीप्रमुख अमर ठोंबरे, एन.डी. गंगापुत्र, विश्वस्त माधवदास राठी, कांचन जगताप, पालखीचे मानकरी ह भ प बाळकृष्ण महाराज डावरे आदी यावेळी उपस्थित होते. असंख्य बाल वारकरी पालखी सोहळयात सामील झाले होते. गेली ३५ वर्षांपासुन मंदिर चौकातील प्रसाद विक्रेते स्व. उत्तम गंगापुत्र पालखीसाठी नगरीच्या प्रवेशद्वारा पासुन बॅण्डसेवा देतात. त्यांचे पश्चात त्यांचे पुत्र भुषण गंगापुत्र हि सेवा नाथांच्या चरणी रुजु करीत आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर रथ आल्यावर नाथांची प्रतिमा डोक्यावर घेऊन मंदिरात नेण्यात आली. येथे भगवान त्र्यंबकेश्वर आणी शिवस्वरुप निवृत्तीनाथांची गर्भगृहात भेट घडविण्यात आली. सभामंडपात नाथांची प्रतिमा कासवावर ठेऊन टाळमृदुंगाच्या गजरात अभंग गायन करण्यात आले. यानंतर मेनरोड मार्गे पालखी कुशावर्त तिर्थावर आणण्यात आली. कुशावर्त तिर्थावर ह.भ.प. जयंत महाराज गोसावी यांनी नाथांच्या पादुकांना स्नान घातले. यावेळी ह.भ.प. अनिल महाराज गोसावी, ह.भ.प. योगेश महाराज गोसावी, सच्चितानंद गोसावी उपस्थित होते. कुशावर्ताला वंदन करून रथ निवृत्तीनाथ मंदिरात नेण्यात आला.
नाथांच्या पादुका सभा मंडपात आल्यानंतर त्या ठिकाणी ‘सकलही तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे बुडी घेई माझे मना आता न करी भ्रांतीचे भ्रमण’ असा अभंग म्हणत पांडुरंगाची आरती तसेच निवृत्तीनाथांच्या आरतीने परतीच्या प्रवासाची सांगता झाली यावेळी पालखी सोहळ्याच्या प्रस्थाना पासून सेवाभावी वारकरी तसेच पोलीस कर्मचारी, पाणीपुरवठा करणारे कर्मचारी, टाळकरी, विणेकरी, तुळशी वृंदावन डोक्यावर ठेवून त्र्यंबकेश्वर पासून पंढरपूर पर्यंत जाणाऱ्या वारकरी महिला, आदींचे नारळ प्रसाद देऊन संस्थातर्फे स्वागत करण्यात आले. नारळ प्रसादाच्या कार्यक्रमानंतर सर्वांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. गावामध्ये पालखी मार्गावर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. ठिकठिकाणी सुवासिनिंनी निवृत्तीनाथांच्या पादुकांना औक्षण केले. पो. नि. बिपिन शेवाळे व त्यांचे सहकार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.