त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – त्र्यंबकेश्वरपासून तीन चार किलोमिटर अंतरावरील तळेगाव काचुर्ली शिवारात आज एक बिबट्या जेरबंद झाल्याने परिसरातील नागरीकांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र या परिसरात अजुन दोन तीन बिबटे असल्याचे बोलले जाते त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे. पाच बालकांचे बळी घेणारा बिबट्या हाच आहे की अजुन दुसरा आहे, याबाबत नागरीकांमध्ये संभ्रमावस्था कायम आहे.
परिसरातील रहिवाशी केशव आचारी हे तळेगाव शिवारात असलेल्या झर्यावर सकाळी साडेआठ नऊ वाजेच्या सुमारास बैलांना पाणी पाजण्यासाठी आले असता बैलांना बिबट्याची चाहुल लागली, बैल पळायला लागले हे बघुन त्यांना संशय आला असता त्यांनी रोडच्या खाली असलेल्या पाईपमध्ये डोकावुन बघितले असता त्यांना पाईपमध्ये बिबट्या लपलेला आढळुन आला. त्यांनी वनविभागाच्या अधिकार्यांना फोनवरुन माहिती दिली. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी व पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बिबट्या पकडण्याची मोहीम सुरु झाली.
ज्या पाईपमध्ये बिबट्या लपला होता त्या पाईपच्या एका टोकाला पिंजरा लावण्यात आला तर दुसर्या बाजुचे तोंड दगडं रचुन बंद करण्यात आले. त्यानंतर दुसर्या बाजुकडुन फटाके वाजवण्यात आले, पाईपमध्ये धुराची नळकांड्या सोडण्यात आल्या. दोन तिन तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्या पिंजर्यात अडकला. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी पो..नि. बिपिन शेवाळे, पो.उ.नि. अश्विनी टिळे, पोलीस कर्मचारी नितिन गांगुर्डे, कैलास आहेर, योगेश पाटील, नाशिक वन अधिकारी विवेक भदाणे, त्र्यंबक वनाधिकारी अजय पवार, ईगतपुरी वनाधिकारी केतन बिरारी, नाशिक, त्र्यंबकेश्वर व इगतपुरी वन कर्मचारी कैलास महाले, सामाजिक कार्यकर्ते अक्षय नारळे, किरण चौधरी, बंडू खोड़े, दर्शन थोपटे, नारायण पारधी, किरण महाले आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बिबट्याला पकडल्यानंतर त्याला नाशिकला हलविण्यात आले आहे. अजुनही दोन तीन बिबटे या परिसरात असल्याची चर्चा असल्याने परिसरातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण कायम आहे.
Nashik Trimbakeshwar Leopard Rescue Operation