त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पावसाने घेतलेली विश्रांती, अधुनमधून ढगांच्या खिडकीतून डोकावणारी सुर्यकिरणे, धरणीमातेने पांघरलेला हिरवा शालु अशा आल्हाददायक वातावरणात हजारो भाविकांनी आद्य ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे भगवान त्र्यंबकराजाच्या दुसऱ्या सोमवारी दर्शनासाठी गर्दी केली होती. पहिल्या सोमवारी सुद्धा भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. पावसाचा जोर कमी होता, सोमवारसह सोमप्रदोष असा योग जुळुन आल्याने आद्य ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे आज भाविकांनी गर्दी केली होती .
रविवारी पुत्रदा एकादशी होती त्यामुळे सकाळी शहरी नागरीकांनी ब्रह्मगिरी प्रदक्षणेचा लाभ घेतला. यात महिलांची संख्या लक्षणीय होती. एखादी दुसरी श्रावणसर वगळता रविवारी दिवसभर पावसाने छान उघडीप दिली होती. रविवारी सायंकाळपासूनच प्रदक्षिणेला भाविकांची गर्दी सुरु झाली. अभंग गात, बम बम भोलेचा जयघोष करीत भाविक प्रदक्षिणेला जात होते. पंचवीस हजारांपेक्षा अधिक भाविकांनी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा केली. पहाटे पासूनच भगवान त्र्यंबकेश्र्वराच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. पूर्व दरवाजातून धर्मदर्शन तर मंदिराच्या उत्तर दरवाजातून पेड दर्शन व नेमुन दिलेल्या वेळेत स्थानिक नागरीकांना दर्शनासाठी सोडण्यात येत होते. धर्मदर्शन रांग गोरक्षनाथ मठाच्या पुढे गेली होती. देणगी दर्शनासाठीही मोठी रांग लागली होती. खासगी वाहनांना याही सोमवारी गावात प्रवेशबंदी होती. त्यामुळे श्रीसंत गजानन महाराज चौकात नाशिक बाजूकडे व जव्हार बाजुकडे रस्त्याच्या दुतर्फा खाजगी वाहनांची गर्दी झाली होती.
दुपारी ठीक तीन वाजता भगवान त्र्यंबकेश्वराच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. पानाफुलांनी सजविलेल्या पालखीत भगवान त्र्यंबकेश्वराचा पंचमुखी सुवर्ण मुखवटा विराजमान करण्यात आला. बॅण्डच्या तालावर वाजतगाजत पालखी कुशावर्त तिर्थावर आणण्यात आली. या ठिकाणी एक तास भगवान त्र्यंबकेश्वराची पुजा अभिषेक करण्यात आला. वंशपरंपरागत पुजारी वेदमुर्ती चिन्मय फडके यांनी पुजाविधी पार पाडला तर शागिर्द म्हणून यज्ञेश कावनईकर, मंगेश दिघे, संजय दिघे, कुणाल लोहगावकर, गंधर्व वाडेकर यांनी सेवा बजावली.
आरती झाल्यावर पुन्हा मुखवटा पालखीत विराजमान करून पालखी मंदिरात आणण्यात आली. भगवान त्र्यंबकराजाचा सुवर्ण मुखवटा काही क्षण सभामंडपातील कासवावर ठेवण्यात आला. यावेळी भाविकांनी बम बम भोलेचा जयघोष केला. यानंतर मुखवटा परत देवस्थानच्या कार्यालयात नेण्यात आला. याठिकाणी भगवान त्र्यंबकेश्वराचा सुवर्ण मुखवटा व रत्नजडीत मुकुटाचे दर्शन भाविकांना घडविण्यात आले. यादरम्यान त्र्यंबकेश्वराचे प्रदोषपुष्प पुजक वेदमुर्ती डॅा. ओमकार उल्हास आराधी यांनी गर्भगृहात प्रदोषपुजा संपन्न केली.
भगवान त्र्यंबकराजाच्या रजत मुखवट्यास उत्कृष्ठ शृंगार करुन आरती केली. या सोहळ्यात मंदिर संस्थानचे विश्वस्त कैलास घुले, स्वप्निल शेलार, पुरुषोत्तम कडलग, मनोज थेटे, रुपाली भुतडा, श्री काळाराम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हा सत्र न्यायाधिश उमेशचंद्र मोरे, यांचे सह देवस्थान ट्रस्टचे अधिकारी, कर्मचारी, शेकडो भाविक सामील झाले होते. सोमप्रदोष निमित्त कुशावर्त तिर्थावर स्नानासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. जवळपास एक लाखाच्या आसपास भाविकांनी आज येथे हजेरी लावली. पोलीस अधिक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे, पो. उप अधिक्षक कविता फडतरे, यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरिक्षक बिपीन शेवाळे व सहकार्यांनी यांनी मोठा बंदोबस्त लावला होता.
A huge crowd of Shiva devotees also on the second Shravan Monday at Trimbakeshwar
Nashik Trimbakeshwar Devotees Crowd Shravan Somvar District Temple