त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ऐन श्रावण महिन्यात त्र्यंबक नगरपालिकेने अतिक्रमणांवर हातोडा चालविला आहे. सध्या श्रावण मासामुळे त्र्यंबक मध्ये दररोज होणारी वाढती गर्दी लक्षात घेता तसेच वाहनांची होणारी वर्दळ पाहून हा निर्णय घेतला आहे. नगरपरिषदेने निश्चित केलेले गाळे पाहता 10 ते 15 फुट रस्त्यावर अतिक्रमित दुकानांची गर्दी झाली आहे. शहरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते मेनरोड लक्ष्मी नारायण चौक ते कुशावर्त तिर्थ, भाजी मंडई, बोहरपट्टी, तेली गल्ली, पोस्ट गल्ली, तेली गल्ली मार्गे एसटी स्टँड रस्ता ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक या प्रमाणे अतिक्रमित दुकानांचे वाढीव अतिक्रमण काढणार असल्याची माहिती नगरपालिका सूत्रांकडून देण्यात आली होती. त्यानुसार आज मोहिम राबवण्यात आली.
अतिक्रमणामुळे दुकानांचा पसारा, त्यात चारचाकी वाहने, दुचाकी, रिक्षा यांची गर्दी त्यामुळे पादचा-यांना पायी चालणे देखील मुश्कील झाले होते. कोणाला रिक्षाचा चुकून धक्का लागला तर रिक्षा चालकांचीच दादागिरी यामुळे कोणाला बोलायची देखील सोय नव्हती. वास्तविक नगर परिषदेने गाळे देतांना फक्त हलकी वाहने व पादचा-यांना मोकळे चालता येईल इतका रस्ता ठेउन दिले होते. पण व्यावसायिकांनी आपल्या हव्यासापोटी मालाच्या पाट्या पुढे लाउन दुकाने लावली होती. विशेषतः हा प्रकार भाजी मंडई, मेनरोड शेजारील स्लॅबवर विविध व्यावसायिकांमध्ये सुरु होता. चालतांना अक्षरशः दुकानांचे रस्त्यावर आलेले बांबू, कास-यांचा दिलेला आधार व छत या मधुन वाट शोधत चालणे भाग होत होते.
एखाद्या दुकानात ग्राहक उभा राहिला की समोरच्या दुकानातील ग्राहकांना उभे राहता येत नव्हते. त्यामुळे या अतिक्रमण मोहिमेचे गावातुन उत्स्फूर्त स्वागत होत आहे. मागचा अनुभव पाहता आतापर्यंत अतिक्रमणाच्या अनेक मोहिमा पार पडल्या पण अतिक्रमण पथकाची पाठ फिरली परत परिस्थिती जैसे थे होत होती. यावेळेस किंवा श्रावण महिना संपेपर्यंत हे काढलेले अतिक्रमण पुन्हा दसरा दिवाळीसाठी वाढु नये ही अपेक्षा गावक-यांकडुन व्यक्त होत आहे. नगरपरिषदेने मोकळे केलेले अतिक्रमण पुनश्च होउ नये म्हणुन काळजी घ्यावी. गावातील अतिक्रमण रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.
अतिक्रमण होणारी ठिकाणे
डाॅ. आंबेडकर चौक, उपजिल्हा रुग्णालया समोर, भारतीय स्टेट बँक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, त्र्यंबकेश्वर मंदिर परिसर, पोस्ट गल्ली, भाजी मंडई दोन्ही बाजु, मेनरोड, लक्ष्मीनारायण चौक ते थेट कुशावर्त चौक
गंगास्लॅबच्या दोन्ही बाजु, बोहोरपट्टी, तेली गल्ली, गगनगिरी महाराज आश्रम ते शिव बिकानेर स्वीट जाण्याचा दोन्ही बाजुचा रस्ता आदी भागात जास्त अतिक्रमणे आहेत. या मोहिमेसाठ काही अतिक्रमण धारकांनी नुकसान होऊ नये स्वतःच अतिक्रमण काढुन घेतली. तथापि ही काढलेली अतिक्रमणे पुनश्च होणार नाहीत याची दक्षता घेतली तरच मोहीम यशस्वी पुर्ण झाल्याचे समाधान नगरपरिषदेला होईल.
दरम्यान आज या मोहिमेचे नेतृत्व प्रशासक तथा मुख्याधिकारी डाॅ.श्रीमती श्रीया स्वप्निल देवचके यांनी स्वतः केले. या मोहिमेत शहर अभियता अभिजित इनामदार, लेखापाल मोहन नांद्रे, सहायक नगररचनाकार मयुर चौधरी, वसुली विभाग प्रमुख विजय सोनार, हिरामण ठाकरे, शाम गोसावी, अमोल दोन्दे, अमित ब्राम्हणकर, भाउराव सोनवणे, नितीन शिंदे, व अन्य कर्मचारी आदींन सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे पोलीसांनी मदत केल्यामुळेच ही मोहीम यशस्वी पार पडली.
Nashik Trimbakeshwar City Encroachment Drive
Rural District Shravan Month