त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – त्र्यंबक जव्हार रस्त्यावर बुवाची वाडी जवळ कारचा अपघात झाला. चालकाचे गाडीवरील ताबा सुटल्याने कार रस्त्यावरुन खाली शेतात पडली. कारमधील दोघे जण जबर जखमी झाले. याबाबत अधिक माहिती अशी की, त्र्यंबकेश्वर बाजूकडून जव्हार बाजूकडे जात असताना कारचा अपघात झाला. कार मधील 19 वर्षीय युवकाचा नाशिक येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. शनिवारी दुपारी दीड पावणे दोन वाजेच्या सुमारास ब्रेझा कार (क्र. MH.48.AT.0977) ही त्र्यंबकेश्वर बाजूकडून जव्हार बाजूकडे जात होती. आंबोली जवळील बुवाची वाडी येथे वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन रस्त्याच्या खाली जाऊन अपघात झाला.
या अपघातात (समीर पाठक, वय 19 वर्षे राहणार पाथर्डी फाटा, नाशिक) याला जबर मार लागल्याने त्यास तात्काळ नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला तर आश्लेषा महाले, समीरा कोल्हे, अंजू शुक्ला सर्वांचे वय 19 वर्षे यांच्यावर त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालय येथे डॉक्टर श्रीमती वाघ व किशोर जावळे यांनी उपचार केले. जखमी असलेल्या तिन्ही मुलींना अधिक उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले. त्यांच्यावर सुविधा हॉस्पिटल येथे उपचार सुरू असल्याचे समजते.
अपघाताची माहिती मिळताच आंबोली गावचे पोलीस पाटील ज्ञानेश्वर मेढे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. त्यांच्या सोबत संजय मेढे, भावडू बोडके, शंकर वाघेरे, तेजस ढेरगे आदींनी जखमींना 108 अम्ब्युलन्स मध्ये उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. किरण चौधरी आणि प्रशांत बागडे यांनी मदत कार्य सुरू ठेवले. दरम्यान या सर्व मुली सातपूर येथील गर्ल्स हॉस्टेलमधील असल्याचे आणि संदीप फाऊंडेशन येथे शिक्षण घेत असल्याचे समजते. त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.