नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या आधारतीर्थ या आश्रमातील चार वर्षांच्या चिमुरड्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेची दखल घेत पोलिसांचा मोठा ताफा आश्रमात दाखल झाला आहे. याप्रकरणी कसून चौकशी सुरू आहे.
नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवर अंजनेरी परिसरात आधारतीर्थ हा आश्रम सुरू करण्यात आला आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या राज्यभरातील मुला आणि मुलींचा सांभाळ या आश्रमात करण्यात येतो. याच आश्रमात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आस्रमातील आलोक विशाल शिंगारे (वय ४, रा. उल्हासनगर) या चिमुरड्याची हत्या कररण्यात आली आहे. याच आश्रमातील एका अल्पवयीन मुलाने या चिमुरड्याचा गळा दाबल्याचे सांगण्यात येत आहे.
आलोक हा मृतावस्थेत आढळल्यानंतर तातडीने त्याला सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. तो मृत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. त्याच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे की, आलोकची हत्या झाली आहे. गळा दाबून त्याचा खून करण्यात आला आहे. आश्रमातच असलेल्या एका नववीच्या विद्यार्थ्याशी त्याचे भांडण झाल्याचे सांगिचले जात आहे. याप्रकरणी अद्याप पोलिसांनी अधिकृत माहिती दिलेली नाही. मृत आलोकचा मोठा भाऊ याच आश्रमात राहतो. या घटनेमुळे आश्रमासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस या प्रकरणी काय तपास करतात आणि तपासात काय उघड होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Nashik Trimbakeshwar Adhartirtha Ashram Child Murder Crime