त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देवदर्शनासाठी ब्रह्मगिरी पर्वतावर गेलेल्या यात्रेकरूचा अंगावर दगड पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भानुदास आसुरबा आरडे (वय ५२) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हा यात्रेकरु बीड जिल्हा माजलगाव तालुक्यातील हरळी लिमगाव येथील रहिवासी आहे.
आरडे हे परिवारासह ते सकाळी साडे नऊच्या सुमारास दर्शनासाठी ब्रह्मगिरीवर गेले होते. दर्शन आटोपुन डोंगरावरुन खाली उतरत असतांना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ब्रह्मा गुफेजवळ ते आले असता आरडे यांच्या अंगावर तीन ते चार दगड पडल्यामुळे त्यांच्या हातपाय आणि डोक्याला जबर मार लागला. रक्तस्त्राव अधिक झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती त्र्यंबक पोलिसांना दिली मिळताच पो. नि. बिपिन शेवाळे, पोलीस कर्मचारी सचिन गवळी, गांगुर्डे, सतीश मोरे व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. ब्रह्मगिरीवरून डोलीवाल्यांच्या सहकार्याने मयत व्यक्तीस गंगाद्वार लगत आणले. त्यानंतर गंगाद्वारवरून त्र्यंबक राजा मित्र मंडळाच्या रुग्णवाहिकेने मृतदेह खाली आणून येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. त्यावेळी डॉक्टरांनी तपासून आरडे यांना मृत घोषित केले.
याप्रकरणी त्र्यंबक पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर ब्रह्मगिरीवरून मृतदेह खाली आणण्यासाठी पोलीस पाटील किसन झोले, अंकुश परदेशी, जगदीश फसाळे, दत्ता मधे, प्रकाश परदेशी, अमर जाधव, धनंजय खोडे, शाम खोडे, अमर बोंबले यांनी सहकार्य केले.
Nashik Trimbakeshwar Accident 1death