नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आश्रमशाळेतील चौघांनी बनावट कागदपत्र बनवून आदिवासी विकास विभागास तब्बल ४७ लाख ४८ हजार ६६१ रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शालार्थ प्रणाली आयडीचा गैरवापर करून हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सहाय्यक प्रकल्पाधिकारी नितांत नागनाथ कांबळे यांनी तक्रार दाखल केली असून मुंबईनाका पोलिस ठाण्यात ठकबाजीसह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा सर्व प्रकार लेखापरिक्षणात समोर आला आहे. मंजूरी नसलेला वेतन व भत्याचा फरक संशयितांनी ऑनलाईन टाकून परस्पर काढून घेतल्याचे त्यात उघड झाले आहे. या अपहार प्रकरणामध्ये संस्थाचालक, मुख्याध्यापक, क्लार्क व शिक्षकाचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. दिंडोरी तालूक्यातील अनुदानित आश्रमशाळेचे संशयित कर्मचारी हर्षल पुंडलिक चौधरी, गोपीनाथ बोडके, लोकेश पाटील, बोडके (पूर्ण नाव समजू शकले नाही) आदींनी बनावट कागदपत्राच्या आधारे ही ठकबाजी केली आहे.
संशयितांनी संगनमत तयार करून मे २०२३ चे वेतन देयके तयार करताना संशयित आरोपी हर्षल चौधरी याचा वेतन व भत्याचा फरक ४७ लाख ४८ हजार ६६१ रुपये अधिकृत मंजूर नसतानाही शालार्थ प्रणालीमध्ये गैरमार्गाने युझर आयडीचा वापर केला. त्याव्दारे आॅनलाईन पद्धतीने वेतन देयकामध्ये समाविष्ट केला. त्यानंतर बनावट कागदपत्रे सादर करून प्रकल्प कार्यालयाची फसवणूक केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत अहिरे करीत आहेत.
Nashik Trible Department 48 Lakh Fraud