नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहरातील वृक्षतोडीचा प्रश्न आता थेट मुंबई उच्च न्यायालयात गेला आहे. उड्डाणपुलासह विकासकामांसाठी वृक्षतोड केली जात आहे. किंवा काही वृक्षतोड प्रस्तावित आहे. खासकरुन उंटवाडी येथील २०० वर्ष जुने महावटवृक्ष तोडण्याचेही प्रस्तावित आहे. याची गंभीर दखल वृक्षप्रेमी ऋषिकेश नाझरे आणि मानव उत्थान मंचचे जसबीर सिंग यांनी घेतली आहे. याप्रकरणी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. या याचिकेची दखल घेत उच्च न्यायालयाने नाशिक मनपा आयुक्तांना नोटीस बजावली आहे. येत्या शुक्रवारी (२८ जानेवारी) दुपारी १२ वाजता या याचिकेची सुनावणी होणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या या सुनावणीस हजर राहण्याची नोटीस उच्च न्यायालयाने मनपा आयुक्तांना बजावली आहे. त्यामुळे या सुनावणीत काय होते याकडे वृक्षप्रेमींसह नाशिककरांचे लक्ष लागले आहे.