नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनने आतोजित केलेल्या अॅटो अॅण्ड लाॅजेस्टिक एक्स्पो देशासह राज्यात चर्चेचा विषय असून एक्स्पोच्या माध्यमातून नाशिकच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रासह संभाजीनगर, बीड या जिल्ह्यातील युवकांना नोंदणी केल्याकेल्या जागेवरच नामवंत कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत. पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात मागील चार दिवसात एक हजार ५२७ तरुणांना नोकरी मिळाली असून त्यापैकी १२१ जणांना जागेवरच आॅफर लेटर मिळाले.
नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनतर्फे ठक्कर डोम येथे आयोजीत आॅटो अॅण्ड लाॅजेस्टिक एक्सपो पाहण्यासाठी नाशिकरांसह राज्यासह देशातील नामवंत हजेरी लावत आहे. नाशिकचे भौगोलिक स्थान बघता देशाची लाॅजेस्टिक कॅपिटल बनण्याची क्षमता आहे. केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील त्याबाबत भाष्य केले आहे. एक्स्पोच्या आयोजनाचा उद्देशच नाशिकला लाॅजेस्टिक कॅपिटल बनवणे हा असून त्यास मिळालेला प्रतिसाद पाहता हा हेतू साध्य होत असल्याचे पहायला मिळते. त्याच बरोबर हजारो युवकांसाठी एक्स्पो रोजगाराची संधी देणारा ठरला आहे.
मागील तीन दिवसात तब्बल एक हजार ९३० युवकांनी नाव नोंदणी केली. त्यापैकी एक हजार १८६ युवकांच्या हाताला रोजगार मिळाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. विशेष म्हणजे देशभरातील २६ नामवंत कंपन्यांमध्ये युवकांना कामाची संधी लाभली. केवळ नाशिकच नव्हे तर जळगाव, धुळे, नंदूरबार, अहमद नगर, पुणे, छत्रपती संभाजी नगर, बीड या शहरातील बरोजगार तरुणांच्या हाताला एक्स्पोमुळे काम मिळाले. सुरुवात बारा हजार रुपयांपासून ते तीस हजारांपर्यंत पगार देण्यात आला.
रोजगाराच्या शोधात असलेल्या युवकांना एक्सपोच्या माध्यमातून बड्या कंपन्याची आॅफर खुणावत आहे.या रोजगार मेळाव्यासाठी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र फड, कार्यकारी अध्यक्ष पी.एम.सैनी यांच्यासह पदाधिकारी व कौशल्य विकास विभागाच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने अथक परिश्रम घेतले.
या दिग्गज कंपन्यांनी दिला रोजगार
महिंद्रा अँड महिंद्रा, बॉश, एम.एस.एल ड्राईव्ह लाईट, व्ही.आय.पी, डेटा मॅटिक, टपारिया टूल्स, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, आदित्य बिर्ला कॅपिटल, एम.एन. कॉम्पोनंट यासह विविध कंपन्यांनाचा सहभाग आहे.
या पदांसाठी भरती
फिटर, वेल्डर गॅस अॅन्ड ईलेक्ट्रिक, मॅकेनिक मोटर व्हेईकल, पेंटर, इलेक्ट्रीशियन, फिटर, डिझेल मॅकेनिक, ईलेक्ट्रानिक मॅकेनिक, शिट मेटल वर्कर, टुल अँन्ड डाय मेकर, वायरमन, १२ वी उत्तीर्ण, डिप्लोमा इन मॅकेनिकल इंजिनिअरींग, मिलींग ऑपरेटींग अँन्ड प्रोग्रामिंग, मेकॅनिक मशिन टुल मेंटेनन्स, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, एमबीए, फायनन्स
एक्स्पो आयोजनाचा हेतू नाशिकला लाॅजेस्टिक कॅपिटल बनवणे हा आहे. त्याच बरोबर युवकांना रोजगार मिळावा हा हेतू साध्य झाला. नामवंत कंपन्यांमध्ये तरुणांना कामाची संधी मिळाली. उत्तर महाराष्ट्रासह इतर शहरातील युवक रोजगारासाठी एक्स्पोला भेट देत नावनोंदणी करत आहे.
– राजेंद्र (नाना) फड, अध्यक्ष, जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन नाशिक
ट्रान्सपोर्ट अॅण्ड लाॅजेस्टिक एक्स्पोत आयोजीत पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात अगदी नाशिकसह राज्यातील कानाकोपर्यातील युवक नावनोंदणी करत आहे. तीन दिवसात एक हजारांहून अधिकांना जागेवरच रोजगार मिळाला. एक्स्पो नोकरीच्या शोधात असलेल्यांना रेड कार्पेट ठरला आहे.
– अनिसा तडवी, सहायक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग
Nashik Transport Expo 121 Youth Employment