नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील आर्टिलरी सेंटरमध्ये अग्निवीर अंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या जवानाचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. हर्षल संजय ठाकरे (वय २१ आर्मी नं. ३४५१७४६, रा. शिंदखेडा, धुळे) असे निधन झालेल्या जवानाचे नाव आहे. हर्षल यांना शुक्रवारी दुपारी उलट्या व तापामुळे त्रास होत असल्याने आर्टिलरी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.
ठाकरे यांच्या निधनामुळे धुळे जिल्ह्यात शोककळा पसरली असून, शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. उष्माघातामुळे महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात दुर्घटना घडल्यानंतर नाशिकमध्येही लष्करी प्रशिक्षण कालावधीत जवानाला उष्माघातामुळे उलटी व तापाचा त्रास झाल्याची माहिती आहे. हर्षल ठाकरे यांना त्रास होत असल्याने लान्स नायक नरेंद्र सिंग यांनी आर्टिलरी सेंटरमध्ये दाखल केले.
येथे डॉ. भरत शिंदे यांनी ठाकरे यांना तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी आर्टिलरी सेंटरतर्फे लेखी माहितीद्वारे पोलिसांना कळवण्यात आले आहे. त्यानुसार देवळाली कॅम्प पोलिसांनी ठाकरे यांच्या मृत्यूप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. इतर जवानांची आरोग्यस्थिती व ठाकरे यांना उष्माघात का झाला, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. देवळाली कॅम्प पोलिस पुढील तपास करीत आहेत.
Nashik Trainee Agniveer Death Heat Stroke