नाशिक – कोकणातील सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळाचे उदघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न झाले आहे. सद्यस्थितीत सिंधुदुर्ग-मुंबई ही सेवा सुरू झाली आहे. मात्र, लवकर आता नाशिककरांनाही थेट विमानाने कोकणात जाता येणार आहे. केंद्र सरकारच्या उडान या योजनेअंतर्गत नाशिकमधून विमानसेवा सुरू झाली आहे. मध्यंतरी मोठ्या प्रमाणात सेवा सुरू होती. मात्र, कोरोना निर्बंधांमुळे विमानसेवेत खंड पडला. आताही काही शहरांसाठी सेवा सध्या सुरू आहे. उडान योजनेअंतर्गत स्टार एअर ही कंपनी नाशिक ते बेळगाव ही सेवा देत होती. सध्या ही सेवा स्थगित करण्यात आली आहे. येत्या काही दिवसातच ती सुरू होणार आहे. याच कंपनीला उडान योजनेअंतर्गत नाशिक ते सिंधुदुर्ग ही सेवाही मंजूर झाली आहे. त्यामुळे बेळगाव बरोबरच सिंधुदुर्ग सेवाही कंपनीकडून मिळण्याची चिन्हे आहेत. चिपी विमानतळ सेवेसाठी सज्ज नसल्याने कंपनीने ही सेवा सुरू केली नव्हती. आता विमानतळ सेवेत आल्याने सेवेलाही प्रारंभ होणार आहे. त्यामुळे नाशिककरांना अवघ्या तासाभरातच सिंधुदुर्ग गाठता येणार आहे.