नाशिक – शहरातील मखमलाबाद परिसरात पाटात पोहण्यासाठी गेलेली तीन शाळकरी मुले बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि नाशिक अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मखमलाबाद रोडवर असलेल्या पाटाच्या पाण्यात पोहण्यासाठी तीन शाळकरी मुले आज दुपारी गेली होती. त्यात तिघे बुडाली आहेत. बुडालेल्यांमध्ये प्रमोद जाधव (वय १३), निलेश मुळे (वय १४), सिद्धू धोत्रे (वय १५) यांचा समावेश आहे. हे तिघेही पेठरोडवरील नामको हॉस्पिटलच्या मागील बाजूस असलेल्या गजवक्र नगरमधील रहिवासी आहेत. मुले बुडाल्याचे कळताच गजवक्र नगरमध्ये एकच गोंधळ उडाला. मुलांच्या कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला. पाटातील पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाल्याचे सांगितले जात आहे. तिघे बुडत असल्याचे पाहून अन्य दोन ते तीन जणांनी आरडाओरडा केला. काही जण मदतीला धावून आले. तर, जीवरक्षकांनाही पाचारण करण्यात आले. मात्र, त्यांना वाचविण्यात अपयश आले. अखेर तिघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.