इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुक्याची लोकसंख्या जिल्ह्यातील इतर तालुक्यांपेक्षा जास्तीची असुन सन २०११ च्या तुलनेत सरासरीने दुप्पट आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात जमिन खरेदी-विक्री व्यवहाराच्या अनुषंगाने होणाऱ्या नोंदी, तद्नुषंगीक दावे, कोर्ट केसेस, विविध प्रकारच्या परवानग्या विषयक कामकाजात सदर तालुक्यात वाढ झालेली आहे. सध्याच्या तहसील कार्यालयातील प्रचंड कामकाज, लोकसंख्यावाढीमुळे तालुक्याचा दिवसेंदिवस होणारा भौगोलीक व औद्योगिक विस्तार यामुळे नाशिक तहसील कार्यालयावर मोठ्या प्रमाणात प्रशासकीय ताण पडत आहे. यासर्व बाबी विचारात घेऊन प्रशासकीय व स्थानिक नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुक्यातील नाशिक येथे स्वतंत्र अपर तहसील कार्यालय स्थापन करुन त्याकरीता आवश्यक पदांची निर्मिती करण्यात आलेली आहे.
राज्य शासनाने नाशिक जिल्हयातील तहसिलदार, नाशिक तसेच, अपर तहसिलदार, नाशिक यांच्या कार्यक्षेत्रातील महसूल मंडळांतर्गत तलाठी साझे व त्यामध्ये अंतर्भूत होणा- या गावांची यादी प्रसिध्दं करण्याबाबतची कार्यवाही जिल्हाधिकारी, नाशिक यांनी करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहे. त्यानंतर नाशिक जिल्हाधिकारी, यांनी तहसिल कार्यालय, नाशिक व अपर तहसिल कार्यालय, नाशिक यांच्या कार्यक्षेत्रातील महसूल मंडळांतर्गत तलाठी साझे व त्यामध्ये अंतर्भूत होणा-या गावांची यादी प्रसिध्द केली आहे.