नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकीकडे कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद पेटलेला असताना आता महाराष्ट्र गुजरात या सीमावर्ती भागातील गावांची समस्या निर्माण झाल्याने मोठे संकट निर्माण झाले आहे. त्यातच या संकटाच्या निवारार्थ नाशिकचे जिल्हाधिकारी सुरगाणा तालुक्यात पोचले असताना दुसरीकडे सुरगाणा तालुक्यातील आदिवासी बांधव यांनी मात्र गुजरातमध्ये जाण्याचा इशारा दिला. त्याची दखल घेत नाशिकचे जिल्हाधिकारी सुरगाणा तालुक्यात ग्रामस्थांशी चर्चा करण्यासाठी पोहचले. मात्र, ग्रामस्थ थेट गुजरातमध््ये जाऊन वासदाच्या तहसिलदारांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
नाशिक हा महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांना जोडणारा सीमावर्ती जिल्हा आहे. या जिल्ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे पेठ – सुरगाणा सारखे आदिवासी तालुके गुजरात राज्याशी जास्त जोडलेले दिसतात, याला कारण म्हणजे त्यांना रस्ते, पाणी, वीज यासारख्या मूलभूत समस्यांना तोंड द्यावे लागते. साहजिकच या तालुक्यातील अनेक आदिवासी बांधव रोजगाराच्या शोधार्थ गुजरात मध्ये जातात. इतकेच नव्हे तर कोणतीही अडचण आली तर नजीकच्या गुजरातमधील तालुक्यांशी संपर्क साधतात. त्यामुळे आम्हाला महाराष्ट्रात राहायचे नाही तर गुजरात मध्ये जाऊ द्या, असे त्यांचे म्हणणे आहे, किंबहुना आमची गावे गुजरातची जोडा, अशी त्यांची मागणी आहे.
नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील आदिवासी बांधव गुजरात जाण्याच्या मुद्दयांवर ठाम असून आज त्यांनी थेट गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील वासदा तहसील कार्यालयात धडक मारली. कारण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ७५ वर्ष उलटूनही सुरगाणा तालुक्यातील अनेक गाव व पाडे सुख सुविधा यांपासून वंचितच राहिली आहेत. तसेच ग्रामीण भागातील गावांचा विकास करता येत नसेल तर ही सर्व गावे गुजरातमध्ये विलीन करा, अशा मागणीचे लेखी निवेदन वासदा तहसीलदारांना देण्यात आले आहे.
सुरगाणा तालुक्याच्या सीमावर्ती भागातील गावे गुजरातमध्ये सामील करण्याची मागणी पुढे आली आहे. कारण गुजरात राज्यातील व गुजरातच्या सीमावर्ती भागात आणि महाराष्ट्रातील सीमावर्ती भागात मिळणाऱ्या सुख सुविधांमध्ये व विकास कामांमध्ये प्रचंड फरक असल्याचे गावित म्हणाले. गुजरातमधील सीमावर्ती भागातील रस्ते, आरोग्य सेवा, पाणी, दळणवळण, वीज पुरवठा आदी नागरिकांना मिळणाऱ्या सोयी सुविधा सुस्थितीत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चिंतामण गावित यांच्यां नेतृत्वाखाली सुरगाणा तालुका सीमा संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा आणि पर्यायाने महाराष्ट्र राज्याचं शेवटचे टोक असल्याने वीज,पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण या सारख्या मूलभूत सोयी सुविधा मिळत नसल्याने ग्रामस्थांनी उठाव केला. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी आधी सुरगाणाच्या तहसीलदाराना निवेदन देऊन मागण्यांकडे लक्ष देण्याची मागणी केली, मात्र त्याला कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी वासदा तालुक्यातील तहसील कार्यालय गाठले, तेथे तहसीलदार यांनी राज्य सरकाकडे पुढील कार्यवाहीसाठी निवेदन पाठविणार असल्याचे आश्वासन दिले.
सुरगाणा तालुक्यातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली असून गेल्या काही वर्षांत २४ तास पूर्ण वीजपुरवठा मिळालेला नाही. दरवर्षी पाणी टंचाई निर्माण होते. सिंचन प्रकल्प नाही. त्यामुळे शेती व्यवसाय पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. गेल्या काही वर्षांपासून मजुरीसाठी होणारे स्थलांतर अद्याप थांबलेले नाही. अर्थात जो सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे होता तो विकास मागील काही वर्षात झाला नाही. असे राष्ट्रवादीचे गावित म्हणाले.
नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरण डी हे सुरगाणा ग्रामस्थांशी चर्चा करण्यासाठी सुरगाणा तालुक्यात गेले. मात्र, ग्रामस्थांनी थेट गुजरातचा रस्ता धरला आणि तेथील तहसिलदारांची भेट घेतली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना विनाचर्चाच नाशिकला परतावे लागले. मात्र, ग्रामस्थांच्या नेमक्या मागण्या काय आहेत आणि त्या सोडविण्यासंदर्भात सरकारकडे पाठपुरावा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सुरगाणा तालुक्यातील आदिवासी पाड्यावरील ग्रामस्थ तथा रुग्ण गुजरात राज्यातील धरमपूर, वासदा, वसलाड ,डांग आशा गावात जात असल्याचे दिसते. आरोग्यच नाहीतर उच्च शिक्षणासाठी ही विद्यार्थ्यांना गुजरात गाठावे लागत आहे, सुरगाणा तालुक्याच्या ठिकाणी अद्यापही आयटीआय, कृषी महाविद्यालय, मेडिकल कॉलेज, यासारख्या उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध नाहीत. तेच गुजरात राज्यात अवघ्या साठ कि. मी. अंतरा- वरील गुजरातच्या शहरांमध्ये या सर्व प्रकारच्या उच्च शिक्षणाच्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत, असे स्थानिक तरूणांनी सांगितले.
Nashik Surgana Villages Gujrat Border Issues Collector