सुरगाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील ठाणगाव बाऱ्हे येथे ५० ते ६० जणांना अन्नातून विषबाधा झाली आहे. हनुमान जयंतीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता. आज सकाळी या सप्ताहाअंतर्गत काल्याचे किर्तन झाले. त्यानंतर महाप्रसाद वाटण्यात आला. याच महाप्रसादाचा लाभ घेणाऱ्या ५० ते ६० जणांना विषबाधा झाली आहे. विषबाधितांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महाप्रसाद घेतल्यानंतर अनेकांना उलटी, मळमळ आणि पोटदुखीचा त्रास झाला. त्यांनी तातडीने ग्रामीण आरोग्य केंद्रात धाव घेतली. पाहता पाहता केंद्रामध्ये जवळपास शंभर रुग्ण आले. काही जणांना प्राथमिक उपचार करुन घरी सोडले. तर, ५० ते ६० जणांवर उपार सुरू आहेत. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीने नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारार्थ आणण्यात आले आहे.
दरम्यान, प्रशासनानेही याची दखल घेतली आहे. आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. तर, पोलिस व अन्य प्रशासनानेही याप्रकरणी कार्यवाही सुरू केली आहे. महाप्रसादाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहे. तालुक्यातील सर्व रुग्णवाहिका ठाणगाव येथे पाठविण्यात आल्या आहेत.
उपचारात अडचणी
आज गुडफ्रायडेची सार्वजनिक सुटी असल्याने बाऱ्हे आणि ठाणगाव आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नव्हते. त्यामुळे उपचारात अनेक अडचणी आल्या. ग्रामस्थांनी विविध पातळ्यांवर संपर्क साधला. पोलिसांनीही वरिष्ठांना कळविले. काहींनी आमदार व खासदारांशी संपर्क साधला. त्यानंतर ग्रामीण आरोग्य केंद्रात काही प्रमाणामध्ये उपचार सुरू झाले.
पालकमंत्र्यांनी दिले हे निर्देश
सुरगाणा तालुक्यातील ठानपाडा येथे 50 ते 52 व्यक्तींना अन्नातून विष बाधा झाली असून यातील दोन जण गंभीर आहेत त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे आणण्यात येत आहे. तर उर्वरित रुग्णांना भाहरे येथे उपचार सुरू आहेत. या सर्व परिस्थितीबाबत पालकमंत्री दादाजी भुसे संपर्कात असून सर्व यंत्रणेला सर्वोतोपरी मदतीचे निर्देश दिले आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात यांना घटनास्थळी पाहणी करण्याच्या सूचना दिल्या असून पालकमंत्री दादाजी भुसे स्थानिक प्रशासन तसेच प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या संपर्कात आहेत.
Nashik Surgana Food Poisoning Health Alert