नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महापालिकेच्या चारही तरण तलावांना उन्हाळी सुट्ट्यांमुळे बच्चे कंपनीचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. खास महिलांसाठीही सुरु केलेल्या स्वतंत्र बॅचेसनाही प्रतिसाद मिळत आहे. खास उन्हाळी सुटीसाठी महापालिकेनी सज्जता केली आहे.
प्रशिक्षित जीवरक्षक, जलनिर्देशक (शिकविणे), पाण्याची उत्तम गुणवत्ता, स्वच्छता, सुरक्षा रक्षक आणि हिरवागार परीसर अशी चारही तरण तलावांची वैशिष्ट आहेत. नाशिक रोड येथील राजमाता जिजाऊ तरण तलाव, गोल्फ क्लब येथील स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव, नवीन नाशिक येथील स्वामी विवेकानंद जलतरण तलाव आणि सातपूर येथील जलतरण तलाव येथे पुरुष आणि महिलांसाठी बॅचेस सुरु आहेत. नाशिक रोड आणि गोल्फ क्लब येथील तरण तलावात पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र पूल आहेत. तेथे एकूण सहा बॅच सुरु आहेत. सातपूर, नवीन नाशिक येथे मात्र सिंगल पूल आहे.
२०२२-२३ या आर्थिंक वर्षात मनपाला चारही तलावांच्या व्यवस्थापनामधून २ कोटी १४ लाख ७१ हजार ८८१ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यात निम्मे उत्पन्न १ कोटी ३ लाख रुपये स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाद्वारे मिळाले आहे. पुरुषांसाठी ५० बाय २५ फूट आकाराचा तर महिलांसाठी २५ बाय २३ फूट आकाराचा पूल आहे. 1 एप्रिलपासून चारही तरण तलाव मिळून सुमारे २,५०० जणांनी लाभ घेतला आहे. त्यात प्रशिक्षणार्थी, मासिक पासधारक, वार्षिक पासधारक यांचा समावेश आहे.
तंदुरुस्त राहण्यासाठी पोहणे चांगला व्यायाम आहे. नाशिककर पालकांनी मनपाच्या जलतरणतलावांतील सुविधांचा लाभ घेऊन पाल्यांचा जरुर प्रवेश घ्यावा, महिला वर्गानेही स्पेशल बॅचेसचा लाभ घ्यावा, असे आवाहन जलतरण तलावांचे मुख्य व्यवस्थापक रुपचंद काठे यांनी केले आहे.
खेळाडूंची चमकदार कामगिरी
राजमाता जिजाऊ आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या दोन्ही तरण तलावांमध्ये प्रशिक्षण घेऊन शेकडो मुलांनी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धेमध्ये यश मिळविले आहे. ही मनपाच्या तरण तलावांची विशेष बाब आहे. स्विमिंग, डायव्हिंग, वॉटरपोलो, ट्रायथलॉन, सिंक्रोनाईज्ड स्विमिंग, सिस्विमिंग अशा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये ४०० ते ५०० खेळाडूंनी चमकदार कामगिरी करुन नाशिकचे नाव उंचावले आहे. त्यातही २५ ते ३० आंतरराष्ट्रीय खेळाडून असून ५०ते ६० राष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू आहेत.
तलावाचे नाव आणि वेळ
१. राजमाता जिजाऊ, स्वातंत्र्यवीर सावरकर तरण तलाव, त्र्यंबकरोड
रेग्युलर बॅच
स. ६.३० ते १०.३०, सायं. ५ ते ७
स्पेशल बॅच
स. १०.३० ते १२.३०
रात्री ७ ते ८.३०
२. स्वामी विवेकानंद नवीन नाशिक, सातपूर तरण तलाव
महिलांसाठी
स. ९.३० ते १०.३०
सायं. ४ ते ५
पुरुषांसाठी
स. ६.३० ते ९.३०, सायं. ५ ते ७
Nashik Summer Season Swimming Tank NMC