नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्याच्या दिवसात उन्हाचा पारा हा वाढत असून जवळपास ते ४० डिग्रीच्यावर असल्याने शीतपेय, फळे, आईस्क्रीम, फ्रोजन डेझर्ट तसेच एनर्जी ड्रिंक्स मोठ्या प्रमाणात बाजारात विक्री होत असून त्या संदर्भात त्याची गुणवत्तेच्या बाबत अन्न औषध प्रशासनाने ठोस मोहीम हाती घेतली आहे. त्याचा भाग म्हणून शरदचंद्र पवार मार्केट या ठिकाणी श्री शारदा फ्रुट्स कंपनी एपीएमसी मार्केट पेट्रोल पंचवटी नाशिक या ठिकाणी अन्नसुरक्षा अधिकारी रासकर यांनी तपासणी करून विक्रीसाठी साठवलेला आंबा व आंबा पिकवण्यासाठी वापरण्यात येणारे इथलिन, रायपनर, सॅचेटचे नमुने घेण्यात आले.
त्यानंतर ओझर येथे व्हीएएनसी एजन्सी ओझर तालुका निफाड या ठिकाणी प्रशासनाच्या अन्नसुरक्षा अधिकारी देवरे यांनी धाड टाकून त्या ठिकाणी विक्रीसाठी साठवलेले शीतपेय थम्सअप, मँगो ड्रिंक्स, माझा, स्टिंग एनर्जी ड्रिंकचे नमुने घेऊन स्टिंग एनर्जी ड्रिंकचे ९६० बाटल्या किंमत रुपये १९ हजार २०० इतका जप्त केला. त्यानंतर वेंकटेश डिस्ट्रीब्युटर्स मालेगाव या ठिकाणी भेट देऊन फ्रोजन डेझर्ट यांचा नमुना घेऊन विश्लेषणासाठी पाठवण्यात आलेला आहे.
२० एप्रिल रोजी आकाश एजन्सी गणेश कंपाउंड जवळके तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक या ठिकाणी अन्नसुरक्षा अधिकारी योगेश देशमुख व सहाय्यक आयुक्त विवेक पाटील यांनी धाड टाकली असता त्या ठिकाणाहून स्टीम कॅफिनेटेड, बीव्हेरेज,थम्स अप, चार्ज कॅफिनेटेडचे नमुने घेऊन एकूण १३ हजार २०० रुपयाचा साठा जप्त केला. सदर प्रकरणी घेतलेली नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेली असून अहवाल प्राप्त होतात पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
सदरची धडक मोहीम ही संपूर्ण उन्हाळाभर अशी सुरू राहील सदरची कार्यवाही अन्नसुरक्षा अधिकारी योगेश देशमुख, अमित रासकर, संदीप देवरे, वाहन चालक निवृत्ती साबळे, नमुना सहाय्यक विजय पगारे यांनी सहाय्यक आयुक्त विवेक पाटील, मनीष सानप, उदय लोहकरे, सहायुक्त नाशिक विभाग संजय नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेतली.
Nashik Summer Cold Drinks FDA Inspection Campaign