नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्याने परिस्थिती अतिशय गंभीर बनली आहे. दोन दिवसांपूर्वीच भारताने एअर इंडियाच्या विमानाद्वारे युक्रेनमधील भारतीयांना मायदेशी सुखरुप आणले. आता युद्ध सुरू झाल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. अशातच नाशिकमधील दोन विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असल्याची बाब समोर आली आहे. याबाबत या विद्यार्थ्यांच्या पालकांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना विनंती अर्ज दिला आहे. विनंती अर्जात म्हटले आहे की, प्रतिक प्रमोद जोंधळे आणि आदिती विवेक देशमुख हे दोन विद्यार्थी सध्या युक्रेनमध्ये आहेत. हे दोघेही तेथे वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. युक्रेनच्या खर्कीव मेडिकल होस्टेलमध्ये ते सध्या वास्तव्यास आहेत. या विद्यार्थ्यांना मायदेशी सुखरुप आणावे, अशी विनंती जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
दरम्यान, युक्रेनमधील युद्ध परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील जे नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत त्यांची तिथे काय व्यवस्था आहे ते पाहण्याच्या तसेच त्यांना परत महाराष्ट्रात सुखरूप घेऊन येण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाशी व्यवस्थित समन्वय साधावा. विशेषत: महाराष्ट्रातील जे विद्यार्थी युक्रेनमध्ये आहेत त्यांची काळजी घेण्याविषयी देखील मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला प्राधान्याने केंद्राशी बोलावे असे सांगितले आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून उद्योग, शिक्षण, व्यवसायनिमित्त तिथे गेलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली असून मुख्य सचिवांना केंद्र शासनाशी समन्वय साधून या नागरिकांशी सातत्याने संपर्कात राहण्याच्या सूचना केल्या आहेत.