नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील सेजल जाधव या फार्मसीच्या विद्यार्थिनीची अमेरिकेतील टेक्सास टेक विद्यापीठामध्ये फार्मासुटीकल सायन्स या विषयात पीएचडी करण्यासाठी पूर्णपणे १००% शिष्यवृत्तीवर निवड झाली आहे. सेजल ही महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. अशा प्रकारे निवड झालेली सेजल ही भारतातील एकमेव विद्यार्थिनी असल्याची माहिती प्राचार्य डॉ. राजेंद्र भांबर यांनी दिली आहे.
अमेरिकेतील टेक्सास टेक हे विद्यापीठ खास संशोधनासाठी प्रसिद्ध आहे. या विद्यापीठामध्ये दरवर्षी एका भारतीय विद्यार्थ्याची निवड केली जाते. या वर्षी नाशिकच्या सेजल जाधव हिची निवड झाली आहे. तिने जीआरई या परीक्षेमध्ये ३४० पैकी तब्बल ३३५ गुण प्राप्त केले तर टोफेल मध्ये १२० पैकी ९९ गुण प्राप्त केले. २६,५०० डॉलर (साधारण दोन लाख रुपये दरमहा) प्रतिवर्ष एवढी शिष्यवृत्ती मिळाली आहे. या निवडीबद्दल सेजलचे महाविद्यालयासह विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
महाविद्यालयाचा गौरव धुमाळ या विद्यार्थ्याचीही अमेरिकेतील मेरीलँड बाल्टिमोर या विद्यापीठामध्ये फार्मासुटीकल सायन्स या विषयात एमएस करण्यासाठी निवड झाली आहे. ही दोघेही २०२१-२२ मधील बीफार्मचे विद्यार्थी आहेत. संस्थेचे समन्वयक डॉ. अपूर्व हिरे यांच्या हस्ते या दोघांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सहसचिव डॉ. व्ही.एस.मोरे, सीडीसी कमिटीचे अध्यक्ष श्री. राजेश शिंदे, विश्वस्त व प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे, प्राचार्य डॉ. सुभाष निकम, प्राचार्य डॉ. देवगावकर, प्राचार्य डॉ. अरुण पाटील, प्राचार्य मा. डॉ. राजेंद्र भांबर, उपप्राचार्य मा. डॉ. जितेंद्र नेहते, उपप्राचार्य डॉ. अंबादास रोटे उपस्थित होते.
Nashik Student Sejal Jadhav Selected for USA PhD Texas Tech University