नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक १ नाशिक यांनी अवैध वाहतुक करणाऱ्या इसमास पकडून त्याच्या वाहनातून रूपये ४४ लाख ८२ हजारांचा मद्यसाठा जप्त केला आहे. अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक १ चे निरीक्षक जयराम जाखेरे यांनी दिली आहे.
मद्यसाठा वाहतुक करणारे वाहन मुंबई -आग्रा रोडने द्वारका येथे थांबविण्याचा प्रयत्न भरारी पथकाने केला असता वाहनचालकाने वाहन अधिक वेगाने उड्डाणपुलावरून आडगावच्या दिशेने भरधाव वेगाने निघाले. भरारी पथकाने पाठलाग करून आडगाव शिवारात सदर वाहन आडवून वाहनाची तपासणी करण्यात आली असता वाहनात पॅम्पर मेडीसीनच्या प्लॅस्टिक गोण्या आढळल्या व गोण्यांच्या मागे दादरा नगर हवेली या ठिकाणी विक्रीसाठी मान्यता असलेल्या परंतु महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंध असलेल्या विदेशी मद्याचे २५० बॉक्स व बिअरचे ८० बॉक्स असे एकूण ३३० बॉक्स आढळून आले आहेत. या साठ्याची एकूण किंमत ४४ लाख ८२ हजार ८०० इतकी आहे.
हा मद्यसाठा वाहतुक करणारे वाहन महिंद्रा कंपनी निर्मित फुरीओ-17D सहाचाकी टेम्पो क्रमांक एम.एच.04 के.यु. 3360 क्रमांकाचे असून वाहन चालकाचे नाव शहबाज हुसेन अन्सारी असे आहे. वाहनचालकाचे वय २७ वर्षे रा.बढुपर, जिल्हा कैमुर, राज्य बिहार येथील रहिवासी असून यास अटक करण्यात आली आहे. मद्य खरेदी, वाहतुक व विक्री करणारे फरार असून याकामी तपास सुरू आहे.
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त मुंबई डॉ. विजय सुर्यवंशी, संचालक (अं.व.द) महाराष्ट्र राज्य मुंबई सुनिल चव्हाण,विभागीय उप आयुक्त राज्य उत्पादन शुल्क नाशिक बी.एच.तडवी, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नाशिक शशिकांत गर्जे, उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नाशिक हर्षवर्धन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली. तसेच भरारी पथक क्रमांक १ चे निरीक्षक जे. एस. जाखेरे, दुय्यक निरीक्षक आर. सी. केरीपाळे, एस. बी. चव्हाणके, सर्वश्री जवान सुनिल दिघोळे, विरेंद्र जाधव, राहुल पवार व कैलास कसबे यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक जे.एस जाखेरे करीत आहेत.
अवैध मद्यनिर्मिती, विक्री, वाहतुक यासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 व 8422001133 या व्हॉटस्ॲप क्रमांकावर अथवा 0253-2319744 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन निरीक्षक श्री. जाखेरे यांनी केले आहे.
Liquor stock worth 44 lakhs seized
Nashik State Excise liquor Stock seized Illegal