नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य परिवहन महामंडळातील महिला कामगारांनी आपल्या मागण्यांचे निवेदन देत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना राख्या पाठवल्या. विभागीय कार्यशाळा पेठ रोड, नाशिक येथील महिला कर्मचारी यांनी या राख्या पाठवतांना लक्ष वेधले.
या निवेदनात म्हटले आहे की, आपण महाराष्ट्रात माझी लाडकी बहीण ही अतिशय स्तुत्य व अभिनंदनीय योजना आणून महिला वर्गास न्याय देण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन. आम्हीपण आपल्या राज्य परिवहन सेवेतील बहिणी आहोत व राखी पौर्णिमेच्या अनुषंगाने आपणास राखी पाठवून आमच्या काही ज्वलंत प्रश्नाकडे आपले लक्ष वेधू इच्छितो.
रा.प सेवेतील कामगारांना शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळावे या व इतर मागणीसाठी संयुक्त कृती समितीने उभारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपण दिनांक ७ ऑगस्ट २०२४ रोजी मुंबई येथे आपणांसह व सन्माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह संयुक्त कृती समितीच्या प्रतिनिधी सोबत बैठकीचे आयोजन केलेत व राप महामंडळातील कामगाराच्या वेतन प्रश्नांवर दीर्घ चर्चा करून आर्थिक प्रश्न निकाली काढण्यासाठी तातडीने उच्चस्तरीय समितीचे स्थापना करून २० ऑगस्ट पूर्वी या समितीस अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. व २० ऑगस्टला परत एकदा संयुक्त कृती समिती सोबत बैठकीचे आपण आयोजन केलेले आहे.
या अनुषंगाने आम्ही आपल्या रा.प. सेवेतील बहिणी आपणास विनंती करतो की, आपण महाराष्ट्र राज्यात अनेक निर्णय हे धाडसाने घेऊन अनेक लोकाभिमुख योजना आणून जनसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहात याचा आम्हाला अभिमान आहे. त्याच धर्तीवर राज्य परिवहन महामंडळातील अतिशय संवेदनशील असलेल्या वेतनाचा प्रश्न योग्य प्रकारे हाताळून राज्य सरकारी कर्मचा-यांएवढे वेतन लाल परींच्या या सेवकांना देण्याबाबत निर्णय घेऊन आचारसंहितेपूर्वी त्याची अंमलबजावणी करावी हीच आम्हा सर्व भगिनीची आपणास राखी पौर्णिमेनिमित्त कळकळीची विनंती आहे. आपण रा.प. सेवेतील जवळपास ८५००० कामगारांना न्याय मिळवून द्याल ही अपेक्षा.