नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– ६० व्या पुरुष आणि महिला राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धेचे आयोजन शेवगाव, अहिल्यानगर येथे १३ ते १६ मार्च दरम्यान करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच नाशिकच्या महिला संघाने उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत नाशिकचा सामना सांगली संघा बरोबर होता. सदोष पंचगिरी मुळे डावाच्या मध्यंतराला नाशिक संघाकडे सहा विरुद्ध पाच अशी अवघी एक गुणांची आघाडी होती.या मुळे दुसऱ्या डावात नाशिकने सांगली संघाचे पाच गडी बाद केल्यामुळे शेवटच्या आक्रमणात विजयासाठी सात गुणांची आवश्यकता होती.सदोष पंचगिरी सोबतीला असून सुद्धा सांगली संघाला शेवटच्या मिनिटा पर्यंत वाट पहावी लागली.नाशिकच्या लढवय्या मुलींना दोन आघाड्यांवर लढावे लागल्यामुळे अखेरीस त्यांना बारा विरुद्ध अकरा अशा एका गुणाच्या निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले.
नाशिक कडून खेळताना कर्णधार कौसल्या पवार १ मि. १५ सेकंद ,२ मि. ३० सेकंद,आणि चार गडी,सुषमा चौधरी नाबाद १ मि. आणि १ मिनिट १० सेकंद, दिदी ठाकरे १ मि. ३० सेकंद, दिक्षा सिताड २ गडी, ऋतुजा सहारे २ गडी, सरीता दिवा १ मिनिट २० सेकंद आणि २ मिनिट व १ गडी, ज्योती मेढे १ मि.४५ सेकंद आणि १ मि. मनिषा पडेर २ मिनिट ३० सेकंद आणि २ गडी , नमिषा भोये १ मि. ३० सेकंद यांच्या चांगल्या खेळीवर सदोष पंचगिरीने मात केली.
संघातील उर्वरित खेळाडू पुढीलप्रमाणे. ताई पवार, विद्या मिरके, जयश्री महाले, हितेशा जाधव, प्रियांका गावंडे, तेजल सहारे.
प्रथमच उपांत्य फेरीपर्यंत धडक मारणाऱ्या नाशिक संघाला पंचांचे आव्हान मात्र न पेलता आल्याने संयुक्त तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले. नाशिक संघाच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल नाशिक जिल्हा खो खो असोसिएशनचे अध्यक्ष डॉ प्रदीप पवार, आजीवन अध्यक्ष रमेश भोसले, कार्याध्यक्ष आनंद गारंमपल्ली, खजिनदार सुनील गायकवाड, सचिव उमेश आटवणे आणि अन्य पदाधिकारी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.