नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय ज्युदो संघटनेतर्फे चेन्नई येथे १७ ते २२ फेब्रुवारी दरम्यान ज्युदोच्या सब ज्युनियर आणि कॅडेट गटाच्या राष्ट्रीय स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नाशिकच्या खेळाडूंनी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करून उत्तम कामगिरी केली. सब ज्युनिअर गटात वैभवी आहेर हिने ३२ किलोखालील वजन गटात आकांक्षा शिंदे हिने तर कॅडेट गटात ४८ कीलोखालील वजन गटात रौप्यपदक पटकावले. तर हार्दिक खोडके आणि रोहित चव्हाण यांनीही उत्तम कामगिरी करत तीन सामने जिंकून आपला सहभाग नोंदविला. या स्पर्धेसाठी रीना खोडके यांनी महाराष्ट्र संघाचे व्यवस्थापक म्हणून काम पाहिले.
तसेच आकांक्षा शिंदे हिने जालंदर, पंजाब येथे झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत कांस्यपदक पटकावले, तसेच भोपाळ येथे ८ ते १० फेब्रुवारी दरम्यान झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेत रौप्यपदक पटकावले.या सर्व खेळाडूंना ज्युदो प्रशिक्षक विजय पाटील, योगेश शिंदे, स्वप्निल शिंदे, शेखर सहाणे यांचे नियमित मार्गदर्शन मिळत आहे. खेळाडूंच्या या उत्तम कामगिरीबद्दल नाशिक जिल्हा ज्युदो असोसिएशनचे सचिव रत्नाकर पटवर्धन, यशवंत व्यायाम शाळेचे अध्यक्ष दीपक पाटील, राज्य ज्युदो असोसिएशनचे खजिनदार रविंद्र मेतकर, माधव भट यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.