नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आरोग्य विषयक योजनांची व्यापक जनजागृती करावी. तसेच गर्भलिंग चाचणी विरोधी व तंबाखू विरोधी मोहिम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रसंगी धडक मोहिम राबवावी, अशा सूचना आज जिल्हाधिकारी गंगधरन डी. यांनी आरोग्य यंत्रणांना दिल्या आहेत.
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रम व तंबाखु नियंत्रण कायदा 2003 अंतर्गत जिल्हास्तरीय समिती, पीसीपीएनडीटी अंतर्गत जिल्हा दक्षता समिती आणि जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध समितींच्या बैठकींचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपील आहेर, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, मालेगाव महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. उत्कर्ष दुधेडिया, डॉ. शरद पाटील, कळवण उपविभागीय रूग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ. अनंत पवार, उपशिक्षण अधिकारी श्री.एस.एन. झोले, राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्राच्या जिल्हा सल्लागार डॉ. शिल्पा बांगर, समुपदेशक कविता पवार यांच्यासह संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्ह्यातील सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
एड्सचा प्रसार रोखण्यासाठी
जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध समितींमार्फत एड्स आजाराचा प्रसार रोखण्यासाठी नियोजन करण्यात यावे. ज्या भागात रूग्णसंख्या जास्त प्रमाणात आढळून येते त्या भागात सेवाभावी संस्थांची मदत घेवून रूग्णांचे समुपदेशन करून जनजागृती करण्यात यावी. यादरम्यान आढळून आलेल्या बाधित रूग्णांवर वेळीच औषधोपचार सुरू करावे. तसेच एमआयडीसी किंवा बांधकाम क्षेत्रातील कामगारांमध्ये जनजागृती करण्यासाठी संबंधित व्यवसायिक किंवा बिल्डर यांच्याशी समन्वय साधून उपाययोजना राबविण्याबाबत नियोजन करण्यात यावे. त्याचप्रमाणे तरूणांमध्ये या आजाराबाबत जनजागृती होण्यासाठी महाविद्यालयीन स्तरावर विशेष मोहिम राबविण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
सोनोग्राफी सेंटरवर होणार धडक कारवाई
जिल्ह्यातील अनधिकृतपणे गर्भलिंगनिदान करणाऱ्या सोनोग्राफी सेंटरवर धडक कारवाई करून दोषी आढळणाऱ्या सेंटरचा समावेश काळ्या यादीत करण्यात यावा, अशा सुचनाही यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यात व तालुकास्तरावर धडक मोहिम राबविण्यासाठी वैद्यकीय अधिक्षक, तहसीलदार, पोलीस यंत्रणेतील वरिष्ठ अधिकारी यांची नियुक्ती करून भरारी पथक तयार करण्यात यावे. या पथकाच्या माध्यमातून तालुका व जिल्हा स्तरावरील सोनोग्राफी सेंटरर्सला अचानक भेटी देवून वेळोवेळी तपासणी करावी. या तपासणी अंतर्गत दोषी अढळणाऱ्या सोनोग्राफी सेंटरवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी सांगितले आहे.
शाळा, महाविद्यालयांमध्ये जनजागृती करावी
जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ‘तंबाखूमुळे सामाजिक आरोग्याला धोका’ या संकल्पनेवर आधारीत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. यासाठी शासकीय कार्यालये व शाळा, महाविद्यालयांमध्ये जनजागृती करून विद्यार्थ्यांचे समुपदेश करण्यात यावे. तसेच शाळा महाविद्यालयाच्या परिसरात तंबाखुजन्य पदार्थंची विक्री करणाऱ्या दुकानांवर धडक मोहिम राबवून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेत आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी 108 हेल्पलाईन सुविधेंतर्गत रूग्णवाहीकांचे बळकटीकरण करण्यात यावे, अशा सुचनाही यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत.
nashik sonography center’s collector order action ias gangatharan d