नाशिक – स्पेनमधील जागतिक गालिचा रांगोळी महोत्सवासाठी नाशिकच्या स्नेहा नेरकरची निवड झाल्याची सुखद वार्ता आहे. स्नेहाने सलग ५ तास अत्यंत आकर्षक रांगोळी काढून नाशिकचे नाव जगभरात झळकवले आहे.
स्पेनमधिल सांतियागो या शहरामध्ये दर ५-६ आणि ११ वर्षाच्या अंतराने जेकेबिन वर्ष म्हणून एक पवित्र सोहळा साजरा केला जातो. या पवित्र वर्षामध्ये स्वर्गाचे दरवाजे उघडले जातात व आपल्या सर्व चुका परमेश्वर माफ करून देतो, अशी मान्यता आहे. म्हणून या वर्षाला पवित्र वर्ष (जाकोबिओ वर्ष) असे संबोधले जाते. अल्फ कामिनो दि सांतियागो या आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत या वर्षी जगभरातील वेगवेगळ्या ठिकाणच्या कलाकारांची निवड करण्यात आली. तसेच, निवड झालेल्यांनी त्या त्या ठिकाणी रांगोळी रेखाटली. जवळपास ३० देशांमधून २८० शहरांमधून रांगोळी कलाकार या उत्सवासाठी निवडले गेले होते.
सांगलीचे आंतरराष्ट्रीय रंगावलीकार किरण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पंचवीस कलाकारांची भारतातून निवड करण्यात आली होती. त्यामध्ये नाशिकच्या स्नेहा नेरकर यांनी आकर्षक अशी रांगोळी रेखाटून या आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. जगाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या मटेरियलचा वापर करून ही रांगोळी साकारून हा सोहळा साजरा केला. जवळपास ५ तासांमध्ये आयोजकांनी दिलेल्या थीमवर आधारित रांगोळी रेखाटन करुन यामध्ये स्नेहा यांनी सहभाग नोंदवला.
रांगोळी क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेतल्याचे पाहून नाशिकसह परिसरांमधून स्नेहा यांचे खुप कौतुक होत आहे. महाविद्यालयीन शिक्षणाबरोबर रांगोळी कला जोपासत त्यांनी आपल्या कलेमध्ये वेगळा ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी या आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये सहभागी होण्याचा सन्मान दिल्याबद्दल स्नेहा यांनी आयोजकांचे आभार व्यक्त केले.