नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खोदकामास विरोध करीत टोळक्याने अभियंत्यास बेदम मारहाण केल्याची घटना बुधवार पेठेतील पाटील गल्लीत घडली. या घटनेत अभियंता गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदेश देवरे,सुशांत शेलार,नंदन भास्करे,अक्षय दाते,अभ्या खाडे व अज्ञात अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. स्वप्नील शिवाजी दानवरे (२८, रा . जेजुरकर मळा, टाकळी रोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. दानवरे हे ठेकेदार बीजे शिर्के कंपनीचे अभियंता आहेत. स्मार्ट सिटीच्या वतीने बुधवार पेठेत पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. या पाईपलाईनचे काम शिर्के कंपनी करीत आहे.
बुधवारी (दि.२९) सायंकाळच्या सुमारास म्हसोबा मंदिर परिसरात दानवरे हे कामगारांच्या माध्यमातून खोदकाम करून घेत असतांना ही घटना घडली. संशयित टोळक्याने खोदकाम बंद करावे अशी मागणी करीत दानवरे यांच्याशी वाद घातला.यावेळी संतप्त टोळक्याने तुझ्याकडे बघून घेवून असे म्हणत त्यांना शिवीगाळ व लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत दानवरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हारूग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सपकाळे करीत आहेत. दरम्यान स्मार्ट सिटी कामावर गेल्या काही महिन्यातील मारहाण होण्याची ही सातवी घटना आहे . वारंवार होणाºया घटनेच्या निषेधार्थ स्मार्ट सिटी अधिकारी पोलिस आयुक्तांची भेट घेणार असल्याचे कळते.
Nashik Smart city work engineer beaten by group crime