नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंगणात खेळत असलेल्या आठ वर्षीय पोलिस कन्येचा इलेक्ट्रीक शॉक लागल्याने मृत्यू झाला आहे. आशेवाडी ता. दिंडोरी येथे ही दुर्देवी घटना घडली आहे. घरासमोरील इलेक्ट्रीक पोलमध्ये वीजप्रवाह उतरल्याने चिमुकलीचा बळी गेला. याप्रकरणी दिंडोरी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आराध्या संदिप बोडके असे मृत चिमुकलीचे नाव आहे. गुरूवारी (दि.२६) दुपारच्या सुमारास आराध्या आपल्या शेतातील घराच्या अंगणात खेळत होती. त्याचवेळी ही दुर्दैवी घटना घडली. विद्यूत वाहिनीच्या अंगणातील लोखंडी पोलात वीज प्रवाह उतरल्याने चिमुकलीचा बळी गेला. खेळत असतांना अचानक तिने पोलला हात लावला असता तिला शॉक लागला. या घटनेत तिला गंभीर दुखापत झाल्याने कुटुंबियांनी तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय सूत्रांनी उपचारापूर्वी तिला मृत घोषित केले. आराध्या ही पोलिस कन्या आहे. नांदगाव पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले संदिप बोडके हे तिचे वडिल आहेत. या घटनेने पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे.