सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील सोनांबे येथील डोंगरावर असलेल्या आई भवानी मंदिरात चोरी झाली आहे. मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने दानपेटी फोडल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. मंदिरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दानपेटी फोडून पैसे चोरतानाची संपूर्ण घटना कैद झाली आहे. सिन्नर पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा तपास करत आहे.
सोनांबे येथील डोंगरावर असलेल्या आई भवानी मंदिरात पहाटेच्या दरम्यान मंदिराचे पुजारी राणू बाबा घोडे पूजा करण्यासाठी आले असता मंदिरातील दानपेटी फुटल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी गावातील नागरिकांशी संपर्क साधून या चोरीच्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर सिन्नर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मंदिरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये चोरीची घटना कैद झाल्याने या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत सिन्नर पोलीस तपास करत आहे.
दानपेटी दरवर्षी दसऱ्याच्या आदल्या दिवशी उघडतात. अंदाजे दीड लाख रुपयांच्या जवळपास रक्कम काढली जाते. चोरट्याने दानपेटी फोडली.त्यानंतर जिथपर्यंत चोरट्याचा हात गेला तेवढी रक्कम त्याने लांबवली. अंदाजे ४० ते ५० हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्याच्या हाती लागल्याने चोरट्याने पोबारा केल्याची घटना घडली आहे. चोरीच्या वाढलेल्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी पुजाऱ्यासह ग्रामस्थांनी केली आहे.