सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनसे कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावरील टोलनाक्याची तोडफोड केल्याप्रकरणी आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. टोलनाका तोडफोड प्रकरणी १२ ते १५ संशयित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला. यातील ५ ते ७ आरोपी अद्याप फरार आहे.
मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांची गाडी अडवल्याने संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा या ठिकाणी रात्री अडीच वाजता टोलनाक्याची तोडफोड केली होती. या तोडफोडीमध्ये जवळपास पाच लाखाचे नुकसान झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
रविवारी रात्री वावी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने कारवाई करत आठ जणांना ताब्यात घेतले आहे. गोंदे टोल नाक्याजवळ उत्तर महाराष्ट्राचा दौरा संपवून अमित ठाकरे हे समृद्धी महामार्गाद्वारे शिर्डी येथे जात असताना त्यांची गाडी अडवण्यात आली होती. त्यामुळे मनसे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी ठाकरे यांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप केला. त्यानंतर निषेध म्हणून टोल नाकाच फोडला.
या सर्व घटनेची व्हिडिओ क्लीप सर्वत्र व्हायरल झाली आहे. त्यात मनसे कार्यकर्ते टोल नाक्याची तोडफोड करत असतांना घोषणा देत असल्याचेही समोर आले आहे. आठ ते दहा कार्यकर्त्यांनी अगोदर टोल नाक्यावरील कॅबिनला लक्ष केल्याचे दिसत आहे. या घटनेनंतर अमित ठाकरे यांनी आपली कालच सविस्तर माहिती दिली होती. तर मनसे नेते बाळ नांदगावकर यांची प्रतिक्रिया समोर आली होती.