सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नांदूरशिंगोटे येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक, पूर्णाकृती पुतळा लोकार्पण सोहळा शनिवार १८ मार्च रोजी सकाळी दहा वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या सोहळ्यात पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे, हेमंत गोडसे आदी उपस्थित राहणार आहेत.
दोन एकराच्या तळ्यात उभे राहिले आकर्षक स्मारक
नांदूरशिंगोटे येथे गावालगत दोन एकराच्या तळ्यात साठवणीचे पाणी राहत होते. या तळ्यालाच आकर्षक रूप देण्यात आले आहे. तळ्याच्या मध्यभागी गोपीनाथ मुंडे यांचा १६ फूट उंचीचा ब्रांझचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला आहे.
आकर्षक विद्युत रोषणाई, तळ्याभोवती जॉगिंग ट्रॅक, बगीचा, परिसरात झालेली सुशोभीकरणाची कामे यामुळे स्मारकाला आकर्षक स्वरूप प्राप्त झाले आहे. युवानेते उदय सांगळे यांच्या संकल्पनेतून हे स्मारक उभे राहिले. त्यासाठी माजी मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, नाईक संस्थेचे हेमंत धात्रक यांचे मार्गदर्शन लाभले.
या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी केले. युवा नेते उदय सांगळे, मजूर फेडरेशनचे संचालक भारत कोकाटे, सरपंच रवींद्र पवार ,पंचायत समितीचे माजी उपसभापती जगन्नाथ भाबड, शिवसेना (ठाकरे गट) उपजिल्हाप्रमुख दीपक खुळे तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर गाडे, माजी नगरसेवक मनोज भगत, शैलेश नाईक, विनायक शेळके, विठ्ठल राजेभोसले, भजूनाथ शिरसाट, देविदास वाजे, सरपंच अरुण वाघ यांनी केले आहे.
Nashik Sinner Gopinath Munde Memorial in Lake