सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील मेंढी येथील शेतकरी सुभाष काळू गिते यांनी पी.एम किसान योजनेचा ऑनलाइन अर्ज दाखल केला होता. मात्र ज्या वेळेस या शेतकऱ्याला पावती हातात मिळाली त्यावेळेस ते जिवंत असताना देखील पावतीवर मृत दाखवण्यात आल्यामुळे त्यांना धक्का बसला.
गिते यांना २०१९ मध्ये पीएम किसान योजनेंतर्गत दोन हप्त्यांचा लाभ मिळाला होता. मात्र त्यानंतर अचानक योजनेचा लाभ मिळणे बंद झाले. त्यानंतर ते केवायसी अपडेट करण्यासाठी वडांगळी महा-ई-सेवा केंद्रावर गेले. येथे केवायसी करतांना पोर्टलवर ‘बेनीफीशयरी इज इनॅक्टिव्ह ड्यू टू डेथ’ असा संदेश आला. आपण जीवंत असतांनी हे कसे आले त्यामुळे त्यांना चांगलाच धक्का बसला. त्यामुळे त्यांनी २७ मार्च २०२३ ला तहसील कार्यालयात ही गंभीर बाब अर्ज करुन निदर्शनास आणून दिली.
या अर्जात पीएम किसान योजनेचा लाभ देण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी अर्जासोबत बँकेचे पासबुक, आधारकार्ड, पॅनकार्ड व सातबारा उताऱ्याची झेरॉक्स प्रत जोडली. तहसील कार्यालयाने त्यांना तोंडीच दोन-तीन दिवसांत काय ते कळवू असे सांगितले. मात्र, त्यानंतर त्यांच्या अर्जाची दखल घेण्यात आली नसल्याचे गिते यांनी सांगितले.
Nashik Sinner Farmer PM Kisan Scheme Benefit