सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील गुळवंच येथे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अद्दल घडवण्यासाठी दोन व्यक्ती थेट किराणा दुकानात बॉम्ब घेऊन आले. शिवाय त्यांनी ५ लाखांची खंडणीही मागितली. या सर्व प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
खतांची गोणी न दिल्याचा राग मनात धरून दोन मित्रांनी दुकानदाराला अद्दल घडविण्यासाठी थेट बॉम्ब फोडण्याची धमकी देत मारहाण केली. त्यानंतर पाच लाखाची खंडणी मागितली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दोघा मित्रा विरोधात सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विष्णू भाबड, बबन भाबड अशी दोन्ही संशयितांची नावे आहेत. हे दोघेही फरार झाले आहे.
विशेष म्हणजे धमकी देणारे दोघेही गुळवंच येथीलच आहे. खतांच्या गोण्या खरेदीवरून हा वाद झाल्यानंतर किराणा दुकानदाराने गोण्या देण्यास नकार दिला होता. याचा राग मनात धरून दोन्ही मित्रांनी संगनमत करून किराणा दुकानदारास अद्दल घडवण्यासाठी ही धमकी दिली. ही धमकी देतांना त्यांनी बॉम्ब सदृश्य स्टीलचा डब्बा घेऊन जात बॉम्ब फोडून उडविण्याचे दुकानदाराला सांगितले. त्यानंतर पाच लाखांची खंडणी मागितली.
पोलिसांची घटनास्थळी धाव
या धमकीनंतर दुकानदार चंद्रकांत विठ्ठल आंबेडकर यांनी तातडीने पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने मालेगाव येथून बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आले. त्यांनी दोन्ही बॉम्ब आज सकाळी निकामी केल्यानंतर पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरु आहे. संशयितांनी स्वतः बॉम्ब बनवला की दुसऱ्या कुणाकडून बनवून घेतला, याबाबत पोलीस तपास करीत आहेत.