सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातून दोडी आणि दापूर येथे मध्यरात्री दोन ठिकाणी घरफोडी करत चोरट्यांनी घरातील सदस्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत दोन महिला जखमी झाल्या आहेत. या घरफोडीत चोरट्यांनी सोन्याचे दागिने व पाच हजार रुपये रोख रक्कमही लंपास केले.
दापूर शिवारात काकड मळा येथील छबू हरी आव्हाड यांचे घराचा दरवाजा उघडून मध्यरात्री साडेतीन वाजेच्या सुमारास तिघा चोरट्यांनी प्रवेश केला. आव्हाड यांचा मुलगा सुनील व त्याची पत्नी सविता हे दोघे झोपलेल्या खोलीत चोरट्यांनी मोर्चा वळवला. हातातील लोखंडी वस्तूंनी या दोघांना चोरट्यांनी बेदम मारहाण केली. या दोघांना नांदूर शिंगोटे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.
घरफोडीचा दुसरा प्रकार दोडी दापूर रस्त्यावरील दोडी शिवारात भारत बन्सी सदगीर यांच्या वस्तीवर घडला. चोरट्यांनी दरवाज्याची आतून लावलेली कडी उघडत प्रवेश केला. यावेळी ताई भारत सदगीर यांना मारहाण करून त्यांच्या अंगावरील दोन ते अडीच तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी हस्तगत केले. त्यांना देखील नांदूरशिंगोटे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे