सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – समृद्धी महामार्गावर आणखी एक अपघात झाला आहे. शिर्डीकडे जाणारी भरधाव वेगातील कार थेट संरक्षण भिंतीवर आदळली आहे. तालुक्यात घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात दोन जण ठार झाले आहेत.
महामार्ग पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिन्नर हद्दीतील समृध्दी महामार्गावर शिर्डीकडे जाणारी स्विफ्ट डिझायर ही कार संरक्षण भिंतीवर जोरदार आदळली. या अपघातात दोन जण ठार झाले आहेत. त्यात चालक हर्षल भोसले व श्रीकांत थोरात यांचा समावेश आहे.
स्विफ्ट डिझायर (क्र.MH-14 EY-7198) ही नाशिकहून शिर्डीकडे जात होती. त्याचवेळी चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ही कार थेट रस्त्यांच्या मध्ये असलेल्या संरक्षण भिंतीवर जाऊन आदळली. गुरुवारी रात्री १ वाजता हा अपघात झाला. महामार्ग पोलीस केंद्र सिन्नर हद्दीतील समृध्दी महामार्गावर किमी ५६१.५ नागपुर लेनवर या अपघाताची नोंद झाली आहे.
अपघातग्रस्त वाहन मुख्य रस्त्यावरून बाजूला असल्याने वाहतूक सुरळीत सुरू आहे. समृध्दी महामार्गावर होणाऱ्या अपघाताचे प्रमाण कमी होत नाही. गेल्या काही दिवसात या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. त्यात हा अपघात झाला आहे.