सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील भूमीअभिलेख कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा (एसीबी) सापळा यशस्वी ठरला आहे. या कार्यालयातील परीरक्षण भूमापक प्रतिभा दत्तात्रय करंजे ही लाचखोर जाळ्यात अडकली आहे. ५ हजार रुपयांची लाच घेताना ती रंगेहात सापडली आहे. याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीचा मनेगाव येथे प्लॉट आहे. या प्लॉटवरील जुन्या मालकाचे नाव कमी करुन नव्या मालकाच्या नावे नोंद करायचे होते. त्यासाठी ती व्यक्ती भूमीअभिलेख कार्यालयात आली. तर, लाचखोर करंजे हिने त्याच्याकडे ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर यासंदर्भात एसीबीकडे तक्रार आली. एसीबीने सापळा रचला आणि हा सापळा यशस्वी ठरला. आता या प्रकरणी करंजे हिच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, लाच देणे आणि घेणे गुन्हा असून याप्रकरणी १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे.