नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अलीकडेच युट्युबवर रिलीज झालेल्या “काय सांगू कशं सांगू” या अहिराणी भाषेतील लोकगीताने महाराष्ट्रभर धमाल केली आहे. युवा गायिका खान्देश कन्या आर्या गायकवाडने गायलेले हे गाणे प्रख्यात लेखक आणि कवी दत्ता पाटील यांनी लिहिले आहे. प्रतिभावान संगीत दिग्दर्शक आणि इंडियन आयडॉल फेम रुषिकेश शेलार यांनी संगीतबद्ध केलेल्या या मधुर कलाकृतीने खांदेशातच नव्हे तर महाराष्ट्रातही झपाट्याने लोकप्रियता मिळवली आहे.
गेली अनेक वर्षे शास्त्रीय आणि भावगीत गायनात प्राविण्य मिळवलेल्या आर्याने या लोकगीताला आपल्या अदाकारीने उत्तमरीत्या सजवले आहे. खान्देशातील सटाणा तालुक्यातील नामपूर परिसरातील तळवाडे भामेर या गावची मूळ रहिवासी असलेल्या आर्याने पहिल्यांदाच अहिराणी गीत गौण लोकगीताच्या सादरीकरणाद्वारे तिच्या सांस्कृतिक वारशाबद्दलचे प्रेम दाखवले आहे. आपल्या लग्नात सासूने केलेल्या जास्तीच्या मागण्यांची सुनेकडून होणारी तक्रार आर्याने आपल्या गाण्यात ग्रामीण ठसका आणून खूप गमतीशीर केली आहे.
प्रसिद्ध लेखक आणि कवी दत्ता पाटील यांनी खास आर्यासाठी पहिल्यांदाच अस्सल अहिराणी बाझ असलेले हे अवखळ गाणं लिहिलं आहे. इंडियन आयडॉल या लोकप्रिय रिअॅलिटी शोमधील टॉप ५ मध्ये पोहोचलेला गायक आणि तरुण संगीतकार ऋषिकेश शेलार यांनी या अहिराणी लोकगीतासाठी संगीत दिले आहे.
रिलीज झाल्यापासून अल्पावधीतच या अहिराणी लोकगीताला प्रचंड प्रतिसाद मिळत असून युट्युबवर हजारो व्युज मिळाले आहेत. आर्याचा मंत्रमुग्ध करणारा आवाज, दत्ता पाटील यांचे उद्बोधक गीत आणि रुषिकेश शेलार यांच्या अप्रतिम संगीत संयोजनाच्या एकत्रित संयोगातून हे अहिराणी लोकगीत निःसंशयपणे एक उत्कृष्ट गाणं बनले आहे. त्यामुळे “काय सांगू कशं सांगू” या गाण्याने संपूर्ण महाराष्ट्रासह इंदोर, बडोदा, बेळगावसारख्या मराठी प्रांतात पोहोचलं आहे.
महाराष्ट्रभर धमाल करत असलेलं खान्देश कन्या आर्या गायकवाडचं नवं कोरं अस्सल अहिराणी मातीतलं गाणं !
“काय सांगू कशं सांगू ! “
युट्युबवर एकदा ऐका..
नक्कीच पुन्हा पुन्हा ऐकाल.
निर्मिती : गावगाडा
गायिका : आर्या गायकवाड
गीतकार : दत्ता पाटील
संगीत : ऋषिकेश शेलार
Nashik Singer Arya Gaikwad Ahirani Song