नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील तीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंग गडावर श्री सप्तशृंगी मातेच्या नवरात्र सोहळा यंदा अधिकच भव्य स्वरूप प्राप्त होणार आहे. पहिले कारण म्हणजे सुमारे दोन-अडीच वर्षे कोरोना काळात अनेक मंदिरे आणि धार्मिक स्थळे बंद होती, त्यानंतर मात्र पुन्हा एकदा सर्वच मंदिरांमध्ये गर्दी दिसू लागली आहे. तर दुसरे कारण म्हणजे श्री सप्तशृंगी देवीच्या मूर्तीवरील अतिरिक्त शेंदूर काढल्याने देवीचे मनोहर आणि विलोभनीय रूप समोर आले आहे. साहजिकच या रूपाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी यावर्षी नवरात्र उत्सवात लोटणार आहे.
अर्धे स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील वणी येथील श्री सप्तशृंगी देवीच्या मूर्तीच्या संवर्धनाचे काम पूर्ण झाले आहे. मूर्तीवरील सुमारे २ हजार किलो पेक्षा अधिक शेंदूर कवच शास्त्रोक्त पद्धतीने काढण्यात आले आहे. त्यामुळे देवीचे मूळ चैतन्यमयी स्वरूप दिसू लागले आहे. पारंपारिक देवी मूर्ती पेक्षा हे स्वरूप वेगळे असून अत्यंत मोहक मूर्ती दिसत असल्याने भाविकांच्या नजर देवी दर्शनाकडे लागल्या आहेत.
गाथा सप्तशक्ती मध्ये वर्णन केल्याप्रमाणे सप्तशृंग शक्तीपीठ त्रवणकार अर्धा मात्रा स्वरूप परमपवित्र दिव्य शक्तीपीठ समजले जाते. नाशिक जिल्ह्यात उत्तरेस सुमारे ४३ कि. मी. अंतरावर चांदवड डोंगराच्या रांगेत सप्तशृंग गड आहे. इंद्रायणी, कार्तिकेयी, वाराही, वैष्णवी, शिवा, चामुंडा, नारसिंह , आणि सप्तशृंग या सात देवता सात शिखरावर वास्तव्य करून आहेत. या गडाच्या पायथ्याशी वणी गाव आहे. त्यामुळे सप्तशृंगी मातेला वणीची देवी असेही म्हणतात. ४५९ दगडी पायऱ्या चढल्यावर प्रथम गणेश कुंड लागते आणि त्यामुळे यादेवीची भव्य मूर्ती दिसते.
– नाशिकमधल्या वणीच्या सप्तशृंगी देवीच्या मुर्ती संवर्धनाचं काम पूर्ण
– नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून मंदिर भाविकांसाठी खुलं होणार देवस्थानचे विश्वस्त निकम यांची माहिती. @DDNewslive @DDNewsHindi #Maharashtra #Nashik pic.twitter.com/kzx5isG8xO
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) September 9, 2022
भव्य शिखरांच्या मधोमध कळ्यांमध्ये जगदंबे चे पवित्र स्थान आहे. पहाडामध्ये सुमारे १९ फूट उंचीची कपार असून तेथे महिरपी खडकात ही मूर्ती कोरली आहे. तिथे प्रदक्षिणा घातली जात नाही. ही मूर्ती सुमारे १२ फूट उंचीची असून तिला १८ हात आहेत. माणिक, माल, कमल, बाण, खड़ग, वज्र, गदा, चक्र, त्रिशुल, कुऱ्हाड, शंख, दंड, घंटा, ढाल, धनुष्य, पानपात्र, धनुष्यबाण, तलवार व कमंडलू अशी विविध आयुधे प्रत्येक हातात आहेत. ही जगदंबा असुरमर्दनार्थ अवतरून तिने शुभंनिशुभं व महिषासुर यांचा वाढ केल्याने तिचे उग्र रूप आहे. मूर्ती पूर्वाभिमुख असून तिची मान दक्षिणेकडे झुकली आहे. कपाळावर खूप मोठे कुंकू, रेखीव भुवया, नाकातील नाथ डोक्यावर मुकुट यामुळे मातेचे रूप आकर्षक वाटते. मूर्ती शेंदुरी रक्तवर्णी आहे. मूर्तीचे तेजस्वी डोळे द्रुष्टांचा थरकाप उडवितो. त्यातच आता मूळ रूपात ही मूर्ती पुन्हा दिसू लागल्याने भाविकांमध्ये समाधान आणि आनंद व्यक्त होत आहे.
वणीची सप्तशृंगीही साडे तीन शक्तिपीठांपैकी अर्ध शक्तीपीठ आहे. महाकाली, महालक्ष्मी आणि सरस्वतीचं एक रूप म्हणजे सप्तशृंगी असं मानलं जातं. महिषासुर राक्षसाबरोबर युद्ध करण्यासाठी देवीने अष्टभुजा रूप घेतलं आणि सर्व देवांनी तिला अस्त्रे दिली अशी आख्यायिका आहे. या देवीची दिवसातून तीन वेळा तीन रूपे दिसतात. सकाळी बालिका दुपारी तरुण, संध्याकाळी वृद्ध दिसते. स्त्रीच्या जीवनातील तीन रुपचं जणू तिच्यात एकवटली आहेत. चैत्र पौर्णिमा आणि नवरात्र असे वर्षातून दोन उत्सव मोठ्या प्रमाणावर होतात. नवरात्राचा दिवस १० दिवसांचा असतो. देवीची पालखी निघते शतचंडीचा यज्ञ होतो. या सात पर्वत शिखरांवर सप्तशृंगी विराजमान झाली आहे. त्या शिखरांवर जाणारी वाट अत्यंत अवघड आहे. एक शिखर ४७५५ फूट उंच आहे.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तिथे पहिल्यांदा भगवा ध्वज लागतो व नवरात्रीचा प्रारंभ होतो व नवरात्रीच्या दिवसात इथे अत्यंत धार्मिक वातावरण असते. वणी येथील सप्तशृंगी देवीच्या गडावर महाराष्ट्रातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. ही देवी उत्तर महाराष्ट्राची कुलस्वामिनी देवी मानली जाते. आता या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू झाला. त्यामुळे मूर्तीचे मूळ स्वरूप एक दिवसासाठी स्थानिक ग्रामस्थ आणि भाविकांच्या साठी खुले करण्यात आले होते ४५ दिवसात देवी मंदिराच्या भोवती महिरापाचे सुशोभीकरण करताना मूर्तीवरील शेंदूर काढण्याचं काम करण्यात आलं. पुरातत्त्व खात्याच्या नियमाचे आणि निकषांचे पालन करून कोणत्याही रसायनांचा वापर न करता हे काम पूर्ण करण्यात आल्याचे सांगण्यात येते. देवीच्या नव्या स्वरूपात हातातील शस्त्रांमध्येही काही बदल झालेला दिसून येत आहे. दरम्यान यंदा मात्र गडावर देवी दर्शनसाठी भाविकांची प्रचंड गर्दी होणार हे निश्चित…
दोन हजार किलो शेंदूर हटवल्याने श्री सप्तशृंगी देवीचे मूळ रूपात दर्शन pic.twitter.com/SpAm8zHbO1
— Sanghratna Gaikwad (@SanghratnaGaik7) September 9, 2022
Nashik Shree Saptashrungi Devi New Look