नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेच्या ठाकरे गटातील तब्बल ११ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने त्याचे मोठे पडसाद नाशकात उमटले आहेत. काल रात्री हे सर्व ११ जण आणि त्यांचे समर्थक मुंबईत गेल्यानंतर आज सकाळीच शालिमार येथील शिवसेना भवनात कट्टर शिवसैनिक जमले. महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, सेना नेते सुनिल बागुल यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांची तातडीची बैठक झाली. यावेळी शिवसैनिक आक्रमक झाले आणि त्यांनी अनेक निर्णय घेतले आहेत.
शिवसेनेच्या ठाकरे गटातील नाशिकचे नेते शिंदे गटात दाखल होणार असल्याचे गेल्या काही दिवसांपासून बोलले जात होते. ठाकरे गटाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख संजय राऊत यांनी दोनदा नाशिक दौराही केला. मात्र त्याचा फायदा झाला नाही. नाशिक महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे, माजी स्थायी समिती सभापती रमेश धोंगडे, माजी नगरसेवक सुदाम ढेमसे, माजी नगरसेवक श्यामकुमार साबळे, माजी प्रभाग सभापती चंद्रकांत खाडे, माजी नगरसेवक सुवर्णा मटाले, माजी नगरसेवक पुनम मोगरे, माजी नगरसेवक जयश्री खर्जुळ, माजी नगरसेवक ज्योती खोले, माजी नगरसेवक प्रताप मेहरोलिया, राजू लवटे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर नाशकातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.
शिंदे गटात गेलेले माजी नगरसेवक दलाल असून आगामी काळात त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, अशी टीका उद्धव ठाकरे गटाचे नाशिकचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी केली. शिंदे गटात गेलेल्या नगरसेवकांपैकी २-३ कट्टर शिवसैनिक होते, तर इतर नगरसेवक हे आयाराम गयाराम होते. त्याचा पक्षाला फरक पडणार नसल्याचेही ठाकरे गटाच्या नेत्यांनी म्हटले आहे. एकगठ्ठा माजी नगरसेवक शिंदे गटात गेल्यानंतर उद्धव ठाकरे गटाची बैठक पार पडली. या बैठकीत शिंदे गटात गेलेले ११ माजी नगरसेवक पुन्हा निवडून येणार नाही, यासाठी तयारी करण्याचे आदेश देण्यात आले.
Nashik Shivsena Thackeray Group Leaders Meeting