नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विचार भिन्न असले तरी किमान समान कार्यक्रमावर शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांची महाविकास आघाडी भविष्यातही कायम राहील, असे ठाकरे गटाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख खासदार संजय राऊत यांनी नाशिक मुक्कामी ठासून सांगितले आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या माजी आमदारांसह अनेक नेत्यांची धाकधूक चांगलीच वाढली आहे. याचमुळे शिंदे गटाला निवडणुकीच्या तोंडावर का होईना अचानक भरती येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शिवसेना ज्यांच्या विरोधात लढली त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन महाविकास आघाडीची स्थापना करण्यात आली. अडीच वर्षे या महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री झाला. काँग्रेस व राष्ट्रवादीचा विचार धर्मनिरपेक्षपतेचा तर शिवसेना हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी असल्याने महाविकास आघाडी अस्तित्वात आली तेव्हाच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. शिवसैनिकांमध्येही कुजबुज सुरु होती. पण प्रादेशिक पक्षांना संपविण्याच्या भाजपच्या खेळीमुळे साऱ्यांनीच ही महाविकास आघाडी मान्य केली. शिवसेनेत मोठे बंड झाल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळले. आणि सध्या शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले आहे.
सध्या सत्तेत नसली तरी आगामी काळात महाविकास आघाडी कायम राहणार असल्याचे वक्तव्य राऊत यांनी नाशिक दौऱ्यात केले. त्याला किमान समान कार्यक्रमाचा आधार देण्यात आला. महाविकास आघाडी कायम राहणार असेल तर आगामी विधानसभेच्या निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात उमेदवारीवरुन चांगलीच रस्सीखेच होणार आहे. कारण, आजवरच्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी किंवा काँग्रेस असेच चित्र होते. त्यामुळे ज्यांच्याविरोधात लढलो त्यांच्यासाठीच आता आपल्या मतदारसंघात पाणी सोडावे लागणार काय, असा प्रश्न ठाकरे गटाच्या नेत्यांना सतावू लागला आहे.
नाशिक जिल्ह्याच्याबाबतीत बोलायचे झाल्यास गेल्या वेळी बहुतांशी लढती राष्ट्रवादी विरोधात सेना, अशाच झाल्या आहेत. निफाड, दिंडोरी, येवला, कळवण, नाशिकरोड-देवळाली यासारख्या तालुक्यात राष्ट्रवादीचे आमदार आहेत. तर मालेगाव आणि नांदगाव मध्ये सेनेचे आमदार निवडून आले होते. या प्रत्येक मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादी हेच प्रतिस्पर्धी होते. आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून एकच उमेदवार रिंगणात उतरवायचा असेल तर विद्यमान आमदारालाच संधी मिळू शकते. यात राष्ट्रवादीचे आमदार जास्त असल्याने तेच उमेदवार म्हणून उतरू शकतात. त्यामुळे राऊत यांच्या वक्तव्याने निफाड तालुक्यात माजी आमदार अनिल कदम, दिंडोरी तालुक्यात धनराज महाले, नाशिकरोड -देवळालीत योगेश घोलप यांची पंचाईत केली आहे.
सेनेच्या माजी आमदारांनी पुन्हा विजयी होण्यासाठी तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादीच्या बाबतीतही हीच स्थिती आहे. नांदगाव तालुक्यात दस्तुरखुद्ध माजी पालक मंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज यांनाच पराभव पत्करावा लागला होता. आगामी निवडणुकीत भुजबळ या मतदारसंघावरील दावा सोडण्याची शक्यता कमीच आहे. पण विद्यमान आमदार शिंदे गटात असला तरी ते सेनेच्या चिन्हावर निवडून आले आहेत. त्यामुळे या मतदारसंघावर सेनेचा दावा आहे. इगतपुरी मतदार संघात विद्यमान आमदार काँग्रेसचा आहे, पण माजी आमदार निर्मला गावित या शिवसेनेच्या आहेत. निफाडमध्ये राष्ट्रवादीचे दिलीप बनकर विद्यमान आमदार आहेत. तर, सेनेचे अनिल कदम हे माजी आमदार. अशीच परिस्थिती अन्य मतदारसंघातही आहे. त्यामुळे ठाकरे गटातील माजी आमदारांमध्ये सध्या भीतीचा गोळा उठला आहे.
शिवसैनिक शिंदे गटाला धूळ चारण्यासाठी आतूर झाले असले तरी प्रत्यक्ष निवडणुकीत त्यांना दोन्ही काँग्रेसची साथ नको आहे. महाविकास आघाडी करायचीच असेल तर निवडणुकीनंतर करा, असे शिवसैनिकांचे म्हणणे आहे. त्यांच्या मागणीला आता माजी आमदारांचेही बळ मिळू शकते. यासंदर्भात उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Nashik Shivsena Politics Upcoming Election Strategy
MP Sanjay Raut Indication