नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय जनता पक्षाचे एकमेव ध्येय आहे ते म्हणजे फोडा आणि राज्य करा. भाजपला शिवसेना फोडायची आणि संपवायची आहे. त्यासाठीच त्यांना शिवसैनिक हवेत आहे. हेच सध्या आपण पाहत आहोत. बंडखोरांच्या डोक्यावर बंदूक ठेऊन भाजपला महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे आहेत, असा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहेत. शिवसेनेची पक्षबांधणी आणि पक्ष पदाधिकाऱ्यांमध्ये पुन्हा जोश निर्माण करण्यासाठी राऊत यांनाही जबाबदारी देण्यात आली आहे. खासकरुन राऊत यांच्यावर उत्तर महाराष्ट्राची धुरा आहे. याचाच एक भाग म्हणून राऊत हे नाशिक दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. याद्वारेच सेनेसोबत कोणकोण आहेत आणि बंडखोर शिंदे गटाकडे कोण गेले किंवा जाण्यास इच्छुक आहेत, त्याची चाचपणीही केली जात आहे.
बैठकीनंतर राऊत यांनी मध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, नाशिक हे नेहमी शिवसेनेच्या आणि बाळासाहेबांच्या पाठिशी उभे राहिले आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत नाशिकमध्ये भगवाच फडकेल, असा दावा त्यांनी केला. सध्या सेनेत कृत्रिम वादळ निर्माण झाले आहे. ते पावसासारखे आहे. शिवसेना पुन्हा नव्या जोमाने पुढे जाईल. आजवरचा इतिहास तेच सांगतो. शिवसेना कधीही संपणार नाही याउलट ती जोमाने फोफावेल. जे सोडून गेले ते पुन्हा विधानसभेत नक्कीच जाणार नाहीत. युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे निष्ठा यात्रेद्वारे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. त्या यात्रेची जनता वाट पाहत आहे. धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेकडेच राहील. त्याची चिंता करण्याची गरज नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
बंडखोर आमदारांकडून पुन्हा सेनेत येण्याची भाषा केली जात आहे. त्याबाबत राऊत म्हणाले की, बंडखोरांनी दररोज नवनवीन मुद्दे मांडत आहेत. आधी म्हणाले निधी मिळत नव्हता, नंतर वेगळेच म्हणाले आणि आता वेगळेच बोलत आहेत. त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्याची गरज नाही. भाजप सध्या माझ्याविषयी बोलत नाही कारण त्यांना ४० नवे भोंगे मिळाले आहेत. भाजपला महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे आहेत. मुंबई आणि विदर्भही वेगळा करायचा आहे. त्यासाठी त्यांना शिवसेना नको आहे. हे षडयंत्र शिवसेना कधीही पूर्ण होऊ देणार नाही. राज्यात स्थापन झालेले सरकार सुद्धा बेकायदेशीर आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. ज्या आमदारांच्या निलंबनाची तक्रार आहे, ज्यांना नोटिस बजावली आहे त्यांनाच राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी बोलवले. हे सर्व गंभीर आहे. लोकशाही धोक्यात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
जब "खोने"के लिए कुछ भी ना बचा हो तो "पाने" के लिए बहुत कुछ होता हैं!.
जय महाराष्ट्र !. pic.twitter.com/BeQNDziC3w— Sanjay Raut (@rautsanjay61) July 8, 2022
Nashik Shivsena MP Sanjay Raut Press Conference BJP Allegation