नाशिक – कोरोनाची दुसरी लाट अद्याप ओसरली नसताना, तिसऱ्या लाटेचे दिलेले संकेत आणि नाशिकमध्ये डेल्टा व्हेरिएंटचे आढळलेले रुग्ण या पार्श्वभूमीवर सर्व काही नियम हे केवळ सर्वसामान्य नाशिककरांसाठीच असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. कारण, नाशिक पोलिसांच्या नाकावर टिच्चून कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, असंख्य पोलिसांच्या डोळ्यादेखत हा प्रकार घडला आहे. अर्थात ही हिंमत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीच केली आहे.
खुटवडनगर परिसरातील सीटू भवन समोर युवा सेनेने मेळावा आयोजित केला होता. आज सायंकाळी झालेल्या या मेळाव्याला शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गर्दी केली. त्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड वाहतूक कोंडी झाली. ही वाहतूक सुरळीत करताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाल्याचे पहायला मिळाले. या मेळाव्यात कोरोनाच्या सर्वच निर्बंधांची बिनदिक्कत पायमल्ली करण्यात आली. हा सारा नजारा नाशिक पोलिस हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेऊन पाहत होते. विशेष म्हणजे, या सर्व प्रकाराची दखल घेऊन जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त हे आयोजकांवर गुन्हा दाखल करणार की सत्ताधाऱ्यांच्या दबावाला बळी पडणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बघा या मेळाव्याचा आणि वस्तुस्थिती दर्शविणारा हा व्हिडिओ