नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा ) – उद्योजक शिरीष सोनवणे यांचा खून हा व्यावसायिक स्पर्धेतून झाल्याचे उघड झाले असून पोलिसांनी तीन जणांना गजाआड केले आहे. सोनवणे यांचा बेंच बनवण्याच्या व्यवसायातीलच हे आरोपी असल्याचेही समोर आले आहे. पोलिसांनी या खून प्रकरणाचा तपास सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन केला आहे. या घटनेतील आरोपी सोमनाथ रामचंद्र कोंडाळकर (वय ३६ वर्ष) याचे वेल्डिंग दुकान असून तो मालेगाव येथील कालिका माता मंदिराचे पाठीमागे राहतो. तर दुसरा आरोपी प्रवीण आनंदा पाटील (२८) हा घुगे मळा इच्छामणी गणपती मंदिर येथील असून तो मूळ राहणारा जळगाव जिल्हयातील भडगाव येथील आहे. तर तिसरा आरोपी अपहरणामध्ये कार चालवत असल्याचे समोर आले आहे.
नाशिकरोड पोलिसांकडे या दोन्ही आरोपींनी गुन्हा कबुल केला आहे. हे आरोपी स्वतः देखील सोनवणे यांच्या प्रमाणे अंबड येथे बेंच व इतर वस्तू बनवण्याचे काम करत होते. परंतु त्यांना फॅब्रिकेशन व्यवसायातील स्पर्धेमुळे त्यांना मोठ्या ऑर्डर मिळत नव्हत्या. सोनवणे यांचा बेंच बनवण्याचा मोठा होलसेल कारखाना असल्याने ते कमी दरात ऑर्डर घेत असल्याने जास्त ऑर्डर त्यांनाच मिळत होत्या. त्यामुळे आरोपींना मागील तीन महिन्यांपासून कोणती ऑर्डर न मिळाल्याने ते आर्थिक अडचणीत सापडले होते. त्यांच्याकडे वर्कशॉपचे व राहत्या घराचे भाडे देणे देखील चार महिन्यांपासून थकीत होते. त्यामुळे त्यांना पैशांची नितांत आवश्यकता असल्याने त्यांनी सोनवणे यास धमकावून त्यांच्याकडून कामाची ऑर्डर घेण्यासाठी अपहरण केले. पण, सोनवणे यांनी आरोपीस विरोध केल्याने त्यांनी त्यांना जीवे मारल्याचे निष्पन्न झाले आहे. तिस-या आरोपींनी सदर गुन्हा करतांना वापरलेली स्विफ्ट डिझायर चालवण्यासाठी सोबत असल्याबाबत कबुली दिली. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची पोलीस कोठडी घेण्यात येणार आहे. नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे या गुन्ह्याचा पुढील तपास करणार आहे.
कालव्यात सापडला होता मृतदेह
एकलहरे रोड येथील फर्निचर व्यावसायिक शिरीष सोनवणे हे ९ सप्टेंबर रोजी त्यांच्या कारखान्यातून बेपत्ता झाले होते. त्यानंतर त्यांचा मृतदेह हा मालेगाव तालुक्यातील सायतरपाडे शिवारातील कालव्यात मिळून आला होता. गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना हा गुन्हा उघडकीस आणण्यास यश येत नव्हते. शहर तसेच ग्रामीण पोलीस या खूनातील आरोपींना पकडण्यासाठी शोध घेत होते. अखेर नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या पोलिसांना यश आले.
पथके तयार करण्यात आली
पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ यांनी गुन्हाचे घटनास्थळी व पोलीस ठाणे येथे भेट देऊन नाशिक रोड पोलीस ठाणे कडील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना गुन्हा उघडकीस आणण्याची सूचना दिल्या. नाशिक रोड पोलीस ठाणे कडून सदर गंभीर गुन्ह्याच्या तपास कामासाठी स्वतंत्र पथके तयार करून गुन्ह्याचा सखोल तपास सुरू करण्यात आला.
असा उलगडला गुन्हा
गुन्ह्याची तपासा तांत्रिक विश्लेषण करून पुण्यातील संशयित यांचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले. सदर फुटेज वरून संशयिताचे फोटो तयार केले. आरोपींचा शोध होणे कामी संशयितांचे फोटो प्रसार माध्यमांमध्ये प्रसारित करून आरोपींची माहिती देणे बाबत जनतेला आवाहन केले होते. त्याचप्रमाणे गोपनीय बातमीदार यांच्याकडून फोटो वरून संशयित माहिती प्राप्त झाली.
Nashik Shirish Sonwane Murder Case Investigation
Crime Police Furniture Businessman