नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्यातील नार – पार प्रकल्प, गोदावरी नदी प्रदूषण मुक्त करणे, जिल्हा झोपडपट्टी मुक्त करणे, मुंबई – नाशिक समृध्दी मार्गाचे काम, ओझर विमानतळाचे काम, नाशिक – पुणे हाय स्पीड रेल्वे अशा विविध जिल्हा विकासाच्या पायाभूत प्रकल्पांना गती देण्यासाठी त्यांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल. त्याच प्रमाणे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेस अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
डोंगरे वसतिगृह मैदान येथे ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाचा नाशिक जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. निलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास, पंचायत राज आणि पर्यटनमंत्री गिरीष महाजन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार हेमंत गोडसे, आमदार किशोर दराडे, ॲड माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, डॉ.राहूल आहेर, सिमा हिरे, देवयानी फरांदे, दिलीप बोरसे, नितीन पवार, मौलाना मुफ्ती मोहम्मद, राहूल ढिकले, हिरामण खोसकर, सुहास कांदे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, नाशिक महानगरपालिकेच्या प्रभारी आयुक्त भाग्यश्री बानाईत यांच्यासह जिल्ह्यातील लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्राचा विकास हे शासनाचे प्राधान्य आहे. राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही. मिनी महाराष्ट्र म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख आहे. तसेच शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. वातावरण बदलामुळे निर्माण होणाऱ्या कोणत्याही नैसर्गिक संकटात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी नागरिकांना आश्वस्त केले.